आरक्षणाच्या मागणीसाठी विविध संघटनांच्या वतीने राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या विरुद्ध पंढरपुरात जागरण गोंधळ

पंढरपूर : पोलीसनामा ऑनलाइन – मराठा समाजास आरक्षण मिळावे, या मागणीसाठी आज विविध संघटनांच्या वतीने राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या विरुद्ध पंढरपुरात जागरण गोंधळ आणि आसूड आंदोलन करण्यात आले. यावेळी मराठा समाजातील तरुणांनी सरकार विरोधात घोषणाबाजी करत आपला रोष व्यक्त केला.

मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी मराठा क्रांती मोर्चाने सोलापूर जिल्हा बंदची हाक देण्यात आली होती. या बंदला पंढरपुरातील व्यापारी आणि दुकानदारांनी बंद पाळून आंदोलनास पाठींबा दर्शवला. येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात विविध संघटनांच्या वतीने राज्य आणि केंद्र सरकारच्या विरोधात आसूड आणि जागरण गोंधळ घालून आंदोलन केले. गोपाळपूर येथे सुद्धा आज सकाळी मराठा समाजाच्या वतीने आरक्षण मागणीसाठी रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. यामुळे पंढरपूर-मंगळवेढा मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प होती. तर पिराची कुरोली येथे पंढरपूर-पुणे मार्गावर रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलकांनी राज्य सरकारविरोधात घोषणाबाजी केली.

शहरात आंदोलनाच्या अनुषंगाने सर्व दुकाने, हॉटेल दिवसभर बंद होती. बंदमुळे नागरिकांची गैरसोय झाली. एसटीची वाहतूक सुद्धा बंद ठेवण्यात आली होती. एसटी बस स्थानकावर शुकशुकाट होता. दरम्यान, दुपारी दीडच्या सुमारास आरक्षण मागणीचे निवेदन आमदार भारत भालके यांच्या उपस्थितीत प्रांताधिकारी सचिन ढोले यांना देण्यात आले. आंदोलनावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण पवार व पोलीस निरीक्षक दयानंद गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

आमदार भालकेंचा आंदोलनाला पाठिंबा
पंढरपुरात मराठा आरक्षण मागणीसाठी विविध संघटनांच्या वतीने सरकार विरुद्ध आंदोलन केले. आमदार भारत भालके यांनी आंदोलस्थळी येऊन आरक्षण मागणीसाठी सुरु असलेल्या आंदोलनास पाठिंब्याचे पत्र दिले. सरकारने दिलेले आरक्षण सर्वोच्च न्यायालयात टिकले नाही. न्यायालयात टिकणारे आरक्षण द्यावे. राज्यात सत्ता नसताना मी आरक्षण मागणीसाठी राजीनामा दिला होता. पण आता मी सत्ताधारी पक्षाचा आमदार आहे. आरक्षण मिळवून घेण्यासाठी सरकारला धाक दाखवण्याची माझ्यात तेवढी धमक आहे. मला राजीनामा देण्याची गरज नाही, असे सांगत सरकारलाही त्यांनी इशारा दिला.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like