Solapur News : सोलापूरचे भाजपचे उपमहापौर राजेश काळेंना अखेर अटक

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन –   सोलापूरचे भाजपचे उपमहापौर राजेश काळे यांना अखेर अटक करण्यात आली आहे. बेकायदा कामांसाठी महापालिका आयुक्त पी शिवशंकर यांना शिवीगाळ आणि उपायुक्त धनराज पांडे यांना पाच लाखांची खंडणी मागण्याचा गुन्हा राजेश काळे यांच्यावर आहे. तसेच एका अधिकऱ्याला बेकायदा काम करण्यासाठी धमकावल्याचा आरोप होता. गुन्हा दाखल झाल्यापासून काळे फरार झाले होते. त्यांना अटक करण्यासाठी पोलिसांची पथके रवाना केली होती. अखेर एक आठवड्यानंतर त्यांना मंगळवारी (दि.5) सकाळी सोलापूरहून पुण्याच्या दिशेने येत असताना टेंभूर्णी जवळ गन्हे शाखेने ताब्यात घेतले.

पालिका उपायुक्त धनराज पांडे यांनी 29 डिसेंबर 2020 रोजी राजेश काळे यांच्या विरोधात सदर बाझार पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर राजेश काळे फरार झाले होते. त्यांना टेंभुर्णीजवळ शहर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांना सोलापुरात आणल्यानंतर त्यांच्यावर अटकेची कारवाई पूर्ण करण्यात आली.

उपमहापौर राजेश काळे यांच्या विरुद्धचा हा पहिलाच गुन्हा नाही तर यापूर्वीही काही गंभीर स्वरुपाचे फौजदारी गुन्हे त्यांच्यावर दाखल आहेत. यामध्ये पुण्यातील पिंपरी-चिंचवड येथील एका गुन्ह्याचा समावेश आहे.

दरम्यान, या प्रकरणी महापालिकेतील सत्ताधारी भाजपची प्रतिमा आणखी मलिन झाल्यामुळे शेवटी पक्षाने त्यांच्या विरोधात शिस्तभंग कारवाई हाती घेतली आहे. पक्षातून काळे यांना बडतर्फ करण्याबाबत अंतिम निर्णय प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे घेणार असल्याची माहिती शहराध्यक्ष विक्रम देशमुख यांनी यापूर्वी दिली आहे.