बनावट जात प्रमाणपत्रामुळं भाजपचे ‘हे’ खासदार अडचणीत

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन – सोलापूरचे भाजपचे खासदार डॉ.जयसिद्धेश्‍वर महास्वामी यांनी लोकसभा निवडणुकीवेळी बनावट जातीचा दाखल जोडला असल्याचा आरोप रिपाईचे प्रमोद गायकवाड यांनी केला आहे. गायकवाड यांनी याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. डॉ.जयसिद्धेश्‍वर महास्वामी यांना याबाबत सोलापूर जिल्हा जात पाहाणी आणि पडताळणी समितीद्वारे नोटीस देखील बजावण्यात आली आहे.

या नोटीशीमध्ये आपल्या प्रमाणपत्राची सत्यता दिलेल्या मुदतीत पटवून द्यावी असे बजावण्यात आले आहे. त्यामुळे समितीच्या नोटीशीला खासदार जयसिद्धेश्‍वर महास्वामी काय उत्तर देतात, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. डॉ.जयसिद्धेश्‍वर महास्वामी यांचा बेडा जंगम जातीचा दाखला बनावट आहे. त्यांच्या शाळेच्या दाखल्यावर हिंदू लिंगायत असा उल्लेख असल्याचा दावाही तक्रारदार प्रमोद गायकवाड यांनी तक्रारीत केला आहे.

सोलापुरात लोकसभेसाठी जयसिद्धेश्‍वर महास्वामी हे भाजपचे अधिकृत उमेदवार होते तर त्यांच्या विरोधात काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीचे देखील तगडे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. मुंबई उच्च न्यायालयाने गायकवाड यांची याचिका दाखल करून घेतल्यानंतर प्रतिवादींना नोटीस पाठवण्याचे निर्देश दिले. तसेच, प्रतिवादींना 5 नोव्हेंबरपर्यंत भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.

लोकसभेच्या निवडणुकीवेळी देखील घेतला होता आक्षेप
लोकसभेवेळी अपक्ष लढलेले प्रमोद गायवाद यांनी जयसिद्धेश्‍वर महास्वामी यांच्या उमेदवारीवर आक्षेप घेतला होता. मात्र या आक्षेपावर विचार न करता निवडणूक अधिकाऱ्यांनी महास्वामी यांचा अर्ज वैध असल्याचे सांगितले होते. मात्र आता गायकवाड यांनी न्यायालयाचे दार ठोठावले आहे. त्यामुळे आता न्यायालय याबाबत काय निर्णय देणार हे पाहन महत्वाचं ठरणार आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/