काय सांगता ! होय, ‘या’ उमेदवारानं चक्‍क घोडयावरून मिरवणूक काढून भरला उमेदवारी अर्ज अन् आला ‘गोत्यात’

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन – विधानसभेच्या निवडणुकीसाठी उमेदवाराने चक्क घोड्यावरून वाजत गाजत मिरवणूक काढत आपल्या उमेदवारीचा फॉर्म भरला. मात्र घोड्यावरून काढलेल्या मिरवणुकीमुळे उमेदवारावर गुन्हा दाखल होऊ शकतो. सोलापूर येथील मतदारसंघातील हा खळबळजनक प्रकार आहे.

लेबर पार्टीच्या बशीर अहमद यांनी आपला उमेदवारी अर्ज भरताना एखाद्या लग्नाच्या वरातीप्रमाणे वाजत गाजत ढोल ताशांच्या गजरात घोडयावर बसून अर्ज दाखल केला. मात्र ही मिरवणूक कायद्याच्या चौकटीत गुन्हा ठरण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोगाने प्रचारात प्राण्यांचे प्रदर्शन आणि वापर करण्यास मनाई केली आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश आयोगाने दिले आहेत. त्यामुळे बशीर यांच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो.

विद्यमान आमदार प्रणिती शिंदे यांच्यामुळे सोलापूर मध्य हा मतदारसंघ आधीच चर्चेत आहे. त्यात आता या अनोख्या उमेदवारीमुळे मतदारसंघ अधिक चर्चेत आला आहे. या सर्व मिरवणुकीबाबत बशीर यांना विचारले असता ते म्हणाले, मला डोळ्यांचा आणि मधुमेहाचा त्रास आहे. प्रकृती अस्वास्थ्यामुळे मी चालू शकत नाही. त्यासाठी माझ्या कार्यकर्त्यांनी घोड्यावरून मिरवणूक काढण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी मी पोलिसांकडे परवानगी मागितली होती, पोलिसांनी मला सकारात्मक प्रतिसादही दिला. त्यामुळे मी ही मिरवणूक काढली.

तसेच पोलिसांनी हा प्रकार चुकीचा असून आम्ही यासाठी परवानगी नाकारली असल्याचेही स्पष्ट केले तसेच नियमांचे उल्लंघन केल्यामुळे बशीर अहमद यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आल्याचे देखील पोलिसांनी सांगितले.

Visit : Policenama.com