कोकणात भाजप Vs शिवसेनेनंतर आता काँग्रेस Vs राष्ट्रवादी, सोलापूरात राष्ट्रवादीनं दिला ‘AB’ फॉर्म

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाईन – राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमध्ये आघाडी आहे.  मात्र सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक अध्यक्ष जुबेर बागवान यांना उमेदवारी दिली आहे. राष्ट्रवादीचे पंढरपूर मतदारसंघातील उमेदवार आमदार भारत भालके यांच्या विरोधात काँग्रेसने शिवाजीराव काळुंगे यांना ए-बी फॉर्म दिला.

त्यामुळे त्याला प्रत्युत्तर म्हणून राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या आदेशाने  राष्ट्रवादीच्या नेत्यांनी थेट  आमदार प्रणिती शिंदे यांच्या विरोधात अर्ज दाखल करून काँग्रेसला आव्हान दिले आहे. दरम्यान, कोकणात नितेश राणे यांना भाजपने अखेरच्या क्षणी विधानसभेचं तिकीट दिलं. मात्र, शिवसेनेने राणेंच्या विरोधात सावंतांना उतरवलं आहे. फार्म माघारी घेण्याच्या तारखेपर्यंत अनेक घडामोडी घडणार असल्याचे सध्याच्या राजकीय परिस्थितीवरून स्पष्ट झाले आहे.

माजी मुख्यमंत्री तथा माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या प्रणिती शिंदे या शहर मध्य विधानसभा मतदार संघातून काँग्रेसतर्फे सलग दोनवेळा आमदार झाल्या आहेत. आता त्या तिसऱ्यांदा नशीब आजमावत आहे.  या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसने जुबेर बागवान यांना अर्ज भरायच्या शेवटच्या टप्प्यात उमेदवारी देऊन राष्ट्रवादीने सर्वांना आश्चर्यचकित केले आहे.