Solapur : पोलीस हवालदार इकबाल शेख यांना पोलीस महासंचालक सन्मान पदक

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर राज्य पोलीस दलात कार्यरत असलेल्या 799 अधिकारी आणि अंमलदारांना पोलीस महासंचालक सन्मान पदक जाहीर करण्यात आले आहे. यामध्ये सोलापूर ग्रामीणमध्ये कार्यरत असलेले पोलीस हवालदार इकबाल अब्दुल रशीद शेख यांना पोलीस दलामध्ये प्रशंसनीय सेवा बजावल्याबद्दल पोलीस महासंचालक सन्मान पदक जाहीर झाले आहे.

पदक जाहीर झाल्यानंतर सोलापूर ग्रामीणचे पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी शेख यांचा सत्कार करुन त्यांचे अभिनंदन केले आहे. बुधवारी (दि.5) छोटेखानी झालेल्या कार्यक्रमात इकबा शेख यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, पोलीस उपअधीक्षक सूर्यकांत पाटील व सोलापूर ग्रामीण जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकारी व अंमलदार उपस्थित होते.

सेवेत 15 वर्षे उत्तम सेवाभिलेख, क्लिष्ट आणि थरारक बहुचर्चित गुन्ह्यांची उकल करुन दोषींविरुद्ध ठोस पुरावे जमा करणे, तसेच नैसर्गिक आपत्तीवेळी केलेल्या उत्तम कामगिरी करणाऱ्या पोलिसांसह 20 वर्षे विनाअपघात उत्तम सेवाभिलेख, राष्ट्रीय स्तरावरील खेळात प्रावीण्य दाखवणे, विशेष शाखेत उत्तम कामगिरी आणि प्रशंसनीय स्वरुपाचे अन्य व अत्युत्तम काम केल्याबद्दल अधिकारी आणि अंमलदारांनाही गौरविण्यात येते. महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील 799 अधिकारी, अंमलदारांना पोलीस महासंचालक पदक जाहीर झाले.