Coronavirus : सोलापुरात 3 डॉक्टर अन् एका नर्सला संसर्ग, कोरोनाग्रस्तांची संख्या 61 वर

पोलिसनामा ऑनलाईन टीम – राज्यभरात कोरोनाचा संसर्ग वेगाने पसरत असून सोलापुरातही रविवारी कोरोनाबाधित नवे 11 रूग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी एकाचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत आढळून आलेल्या एकूण रूग्णांची संख्या 61 वर पोहोचली आहेत.

सांगोला पाठोपाठ मोहोळ तालुक्यात कोरोनाबाधित रूग्ण आढळून आला आहे. रविवारी नव्याने आढळून आलेल्या करोनाबाधित अकरा रूग्णांमध्ये तीन डॉक्टर आणि एका परिचारिकेचा समावेश आहे. शहरात कोरोनाचा पहिला रूग्ण 12 एप्रिलला आढळून आला होता. आतापर्यंत 14 दिवसांत रूग्णांची संख्या वाढून 61 वर पोहोचली आहे. तर मृतांची संख्याही पाच झाली आहे. सध्या 56 रूग्णांवर छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रूग्णालयात उपचार केले जात आहेत.

अद्यापि करोना चाचणीचे 176 अहवाल प्राप्त व्हायचे आहेत. शास्त्रीनगरातील तीन रूग्णांचा समावेश आहे. तर पाच्छा पेठ, हुतात्मा कुर्बान हुसेननगर, नई जिंदगी चौक, कर्णिकनगर, यशवंत सोसायटी, सोलापूर तालुका पोलीस ठाणेलगतचा परिसर आणि सोरेगाव एसआरपी कॅम्प परिसरात प्रत्येकी एक याप्रमाणे 10 रूग्ण नव्याने सापडले आहेत. तर एक रूग्ण मोहोळ तालुक्यातील पाटकूल गावात राहणारा आहे. जिल्ह्यात सांगोला तालुक्यातील घेरडी येथे शनिवारी कोरोनाबाधित रूग्ण आढळून आला होता. त्यापाठोपाठ मोहोळ भागातही कोरोनाचे लोण पसरल्यामुळे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात धोका वाढला आहे.