सोलापूर जिल्ह्यात कोरोनाचा कहर ! जिल्हाधिकारी कार्यालयात अवघ्या चार दिवसात 5 कर्मचाऱ्यांचा मृत्यू

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन – सोलापूर जिल्ह्यात कोरोनाने थैमान घातले आहे. जिल्ह्यात दररोज 1 हजारापेक्षा अधिक नवीन रुग्णांची भर पडत आहे. तर दररोज जवळपास 25 लोकांचा मृत्यू होत आहे. धक्कादायक बाब म्हणजे सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात अवघ्या 4 दिवसात 5 कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. विविध विभागात काम करणाऱ्या आपल्या सहकाऱ्यांच्या मृत्यूमुळे कार्यालयातील कर्मचारी हळहळ व्यक्त करत आहेत.

जिल्हाधिकारी कार्यालयातील अन्न धान्य वितरण विभागात काम करणाऱ्या बापूय्या स्वामी (वय 45) यांचे 9 एप्रिल रोजी निधन झाले. अन्न धान्य वितरण विभागात अव्वल कारकून म्हणून ते कार्यरत होते. त्यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुली असा परिवार आहे. त्यानंतर आंधळगाव मंडळातील मारापूर मुख्यालयाचे कृषी सहायक असलेले प्रशांत कोळी (वय 37) यांचे 17 एप्रिल रोजी निधन झाले. तसेच कार्यालयात कृषि पर्यवेक्षक असलेल्या अशोक कुंभार (वय 56) यांचा देखील कोरोनाने बळी घेतला. निवडणूक शाखेत शिपाई पदावर काम करणाऱ्या अण्णासाहेब साबळे (वय 35) यांचा 18 एप्रिल रोजी मृत्यू झाला. जवळपास 18 दिवस ते मृत्यूशी झुंज देत होते. साबळे हे 2005 साली अनुकंपावर महसूल विभागात रुजु झाले होते. त्यांच्या पश्चात पत्नी, 3 बहिणी, 8 वर्षाची मुलगी आणि अवघ्या 6 वर्षाचा मुलगा आहे. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात सुरक्षारक्षक असलेल्या राजेंद्र वेदपाठक (वय 54) यांचा मंगळवारी (दि. 20) मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, मुलगी असा परिवार आहे. तर उत्तर सोलापुरातील कवठे गावातील कोतवाल उद्धव राजपूत यांचा देखील मंगळवारी कोरोनाने मृत्यू झाला आहे.