सोलापूर : पोलीसनामा ऑनलाईन – Solapur Crime News | एकाच गावात घराशेजारी राहणाऱ्या तरुणाने आणि एका अल्पवयीन मुलीने आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. समर्थ उर्फ बाळू दत्तात्रय लोंढे (वय-२०) व आरती दीपक कसबे (वय १७, दोघे रा- पांगरी, ता- बार्शी, जि- सोलापूर) अशी आत्महत्या केलेल्या दोघांची नावे आहेत. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून यामागील कारण अद्याप समोर आलेले नाही.
याबाबत समर्थ उर्फ बाळू लोंढे याचे चुलते संजय रावसाहेब लोंढे (वय-४८, रा. पांगरी) यांनी पांगरी पोलिसात दिलेल्या फिर्यादीमध्ये म्हटले आहे की, आज दुपारी २ वाजताच्या पूर्वी समर्थ दत्तात्रय लोंढे याने मंदाकिनी रामचंद्र घावटे यांच्या शेतातील चिंचेच्या झाडाला नायलॉन दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. तर दुसऱ्या घटनेमध्ये आरती कसबे हिने स्वतःच्या राहत्या घरातील लोखंडी पाईपला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती तिचा भाऊ साहिल दीपक कसबे (वय-२२) याने पोलिसात दिली आहे.
दोघेही एकाच गावात आणि अगदी शेजारी राहत होते. याप्रकरणी पांगरी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेचा अधिक तपास सहाय्यक फौजदार सतीश कोठावळे व पोलिस हेडकॉन्स्टेबल गणेश दळवी करत आहेत.