दुष्काळामुळे सोलापूर जिल्ह्यातील ‘या’ गावातील मुलांना मिळेनात लग्नासाठी मुली

रानमसले (सोलापूर) : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त सोलापूर जिल्ह्यात राहणारा २८ वर्षीय महेश गरड मागील तीन वर्षापासून लग्नासाठी मुलगी शोधत आहे. उत्तर सोलापूर तालुक्यातील रानमसले गावामध्ये कांद्याची शेती करणाऱ्या महेशला पाहण्यासाठी मुलीकडचे येतात. त्यांच्यामध्ये बोलचाली होतात आणि निघून जातात. मात्र, पुन्हा पुढील बोलणी करण्यासाठी येत नाही. रानमसले या गावात शंभराहून अधिक मुले लग्नाची आहेत. मात्र, दुष्काळामुळे या गावात कोणीच मुलगी देण्यास तयार नाहीत.

महेशचे म्हणणे आहे, गावात पाण्याची कमतरता असल्याने आपल्या मुलीला देखील लग्नानंतर पाण्यासाठी त्रास सोसावा लागेल या भितीने बोलाचाली करण्यासाठी आलेले पाहुणे पुन्हा परत येतच नाहीत. त्यामुळे असे वाटतेय नवरी मुलगी शोधण्यासाठी गाव सोडावे. या गावात पाण्याचा प्रश्न बिकट असल्याने गावातील मुली गावसोडून निघून जात आहेत. या गावची लोकसंख्या पाच हजार असून या ठिकाणी गरड अडनावाची अनेक कुटुंब वास्तव्यास आहेत. गावातल्या गावात लग्न करू शकत नसल्याने या ठिकाणची मुलं आणि मुलींना इतर ठिकाणी लग्न करावे लागते.

या ठिकाणी वारंवार दुष्काळ पडत असल्याने मुली शोधण्याच्या समस्या दिवसेंदिवस वाढत चालल्या असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. गावातील मुले कामाच्या शोधात गाव सोडून जात आहेत तर काही मुले दुसऱ्या जातीतील मुलीसोबत लग्न करण्याचा पर्याय निवडतात. याच गावातील सतीश शिंदे म्हणतो, शेती सोडून गावाजवळील मोहोळ किंवा पंढपूर तालुक्यात मजूरी करण्यासाठी जावे लागते.

यदाच्या वर्षी सोलोपूर जिल्ह्यामध्ये फक्त ३८ टक्के पाऊस पडला. त्यामुळे या भागाला दुष्काळाशी झुंज द्यावी लागत आहे. मागील पाच वर्षात तिसऱ्यांदा या भागात दुष्काळ पडला आहे. रानमसले गावाला दुष्काळग्रस्त म्हणून घोषीत कारवे अशी मागणी गावकऱ्यांकडून होत आहे. परंतु गावाला दुष्काळग्रस्त म्हणून घोषीत केले जात नाही. गावचे उपसरपंच बालाजी गरड यांनी सांगितले, या गावाला दुष्काळग्रस्त म्हणून घोषीत केले तर सरकारी मदत मिळू शकते. परंतु या गावाला दुष्काळग्रस्त म्हणून घोषीत केले नसल्याने या गावाला सरकारी मदत मिळत नाही. यामुळे गावकऱ्यांनी आगामी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.

सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधीकारी राजेंद्र भोसले यांनी सांगितले की, उत्तर सोलापूर तालुक्यात ७५ टक्क्यापेक्षा अधिक पाऊस पडला आहे. या गावाला आवश्यक सुविधा मिळू शकतात. जसे गावाला पाण्याचे टँकर, पीक विमा, शेतीच्या विज बिलात सूट यामुळे या गावाला दुष्काळग्रस्त गाव म्हणून घोषीत करण्यात आले नसल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले.