सोलापूर येथील पोलिस-दरोडेखोर चकमकीला वेगळं वळण

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन – रविवारी पहाटे अडीच ते तीन वाजण्याच्या सुमारास ग्रामीण पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ उळे गावाजवळ दरोडेखोरावर गोळी झाडली आणि जखमी झालेल्या दरोडेखोर विनायक काळेचा मृत्यू झाला. पोलिस आणि दरोडेखोरांमध्ये झालेल्या चकमकीला आता वेगळं वळण लागलं असुन पोलिसांनी बनाव रचुन विनायकची हत्या केल्याचा आरोप त्याच्या नातेवाईकांनी केला आहे. जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा रूग्णालया बाहेर आंदोलन करण्याचा इशारा देखील त्यांनी दिला आहे.

पोलिस आणि दरोडेखोरांमध्ये चकमक ; ३ पोलीस जखमी तर दरोडेखोर ठार 

सोलापूर ग्रामीण पोलिस दलातील पोलिस अधिकारी विजय पाटील, पोलिस कर्मचारी विकास फडतरे, विक्रम दराडे आणि त्यांचे सहकारी उळे गावाजवळ गस्त घालत होते. त्यावेळी 5 ते 6 जण संशयितरित्या हलचाली करीत असताना पोलिसांनी दिसले. पोलिसांनी त्यांच्याकडे चौकशी करीत असताना त्यांनी वाद घालण्यास सुरवात केली. पोलिसांनी 5 ते 6 जणांपैकी एक असलेल्या विनायक काळेला गाडीत बसविण्यासाठी पकडले असता त्याने त्याच्याकडे असलेल्या हत्याराने पोलिस अधिकारी विजय पाटील यांच्या हातावर व मांडीवर वार केले तसेच इतर पोलिसांवर दरोडेखोरांनी हल्‍ला चढविला. पोलिस अधिकारी विजय पाटील यांनी स्वसंरक्षणार्थ विनायक काळे याच्यावर गोळी झाडली. त्यामध्ये तो गंभीर जखमी झाला. त्या दरम्यान इतर दरोडेखोरांनी तेथुन पळ काढला. उपचारासाठी विनायकला रूग्णालयात दाखल करण्यात आले मात्र त्याचा मृत्यू झाला.

Solapur : Encounter between Police and robbers, one robber died in Police firing | सोलापूर : पोलीस आणि दरोडेखोरांमध्ये चकमक, पोलिसांच्या गोळीबारात एक दरोडेखोर ठार

पोलिस सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मयत झालेल्या विनायकविरूध्द यापुर्वी 3 गंभीर गुन्हे दाखल आहेत. गेल्या काही महिन्यांपासुन परिसरात डिझेल चोरी करणारी टोळी सक्रिय झाली होती. विनायक हा त्या टोळीशी संलग्‍न असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्‍त केला आहे. दरम्यान, विनायक काळेच्या नातेवाईकांनी पोलिसांवर आरोप केले असुन पोलिसांनी बनाव रचुन त्याची हत्या केल्याचे त्यांचे म्हणणे आहे. इयत्‍ता 12 वी पास असलेला विनायक सध्या पोलिस भरतीची तयारी करीत होता. त्याची एक बहिण इंजिनिअर आहे तर दुसरी पदवीधर असून ती एमपीएससीची तयारी करीत आहेत. पोलिसांनी बनाव रचुनच विनायकचा बळी घेतला आहे.

विनायकच्या शरिरावर मारहाणीच्या खुणा देखील दिसत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. घडलेल्या प्रकरणाच्या चौकशीची मागणी करीत नातेवाईकांनी सरकारी रूग्णालय आणि जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. दरम्यान, प्रकरणाची राष्ट्रीय मानव अधिकारी आयोगाच्या निकषाप्रमाणे चौकशी होणार असल्याची माहिती सोलापूर ग्रामीण पोलिस दलाचे पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिली आहे.