सोलापुरात शिंदेंच्या अडचणीत वाढ ? ‘या’ पक्षाचा प्रकाश आंबेडकरांना पाठिंबा

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाईन – सोलापूर मतदार संघात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने प्रकाश आंबेडकर निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर काँग्रेसच्या वतीने सुशीलकुमार शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या दोघांमध्ये चुरशीची लढत होणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली असताना अशातच आता मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने वंचित बहुजन आघाडीच्या प्रकाश आंबेडकरांना जाहीर पाठिंबा दिला आहे. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीचे सामर्थ्य आणखी वाढले आहे. याबाबतची माहिती सीपीआयएमचे नेते आणि माजी आमदार नरसय्या आडम यांनी गुरुवारी दिली.

यावेळी बोलताना आडम म्हणाले, ‘१९५२ साली बाबासाहेब आंबेडकरांच्या झालेल्या पराभवाचे दुःख दूर करण्यासाठी त्यांच्या नातवाला आम्ही पाठिंबा देत आहोत’. दरम्यान मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने वंचित बहुजन आघाडीला पाठिंबा दिल्यामुळे मात्र काँग्रेसचे उमेदवार आणि माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. सोलापुरात १८ एप्रिल रोजी मतदान होत आहे.

सत्तेत येऊ द्या, निवडणूक आयोगालाही जेलची हवा खायला पाठवू : प्रकाश आंबेडकर
आगामी लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु झाली आहे. राजकीय सभा, रॅली आणि प्रचाराला वेग आला आहे. सभेदरम्यान केल्या जाणाऱ्या भाषणांमध्ये विरोधी पक्षांवर टीका केल्या जात आहेत मात्र यवतमाळ येथे बोलताना वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी थेट निवडणूक आयोगालाच टीकेचे लक्ष्य केले आहे. ‘पुलवामा घटनेवर काही बोलले की निवडणूक आयोग बंदी लावतं. ही यंत्रणा भाजपच्या हातातील बाहुले आहे. आम्हाला सत्तेत येऊ द्या, यांना देखील जेलची हवा खायला पाठवू ‘ असे खळबळजनक विधान आंबेडकर यांनी केले आहे. यवतमाळ- वाशीम मतदार संघातील उमेदवाराच्या प्रचारासाठी दिग्रस येथील सभेदरम्यान ते बोलत होते.