‘पवारांचा प्रचार करायचा असेल तर भाजपमुळे मिळालेली पद सोडा’

पंढरपूर : पोलीसनामा ऑनलाईन – सहकारमंत्री सुभाष देशमुख आणि सोलापूरचे पालकमंत्री विजय देशमुख यांच्यातील वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. सोलापूर, माढा लोकसभा मतदारसंघाच्या बैठकीत हा वाद समोर आला आहे. भाजपच्या लोकसभा निवडणुकीसाठी झालेल्या महत्वाच्या बैठकीला विजय देशमुख यांच्या गटाने हजेरी लावली नाही, त्यामुळे सुभाष देशमुख चांगलेच संतापले. आणि जिल्हा परिषद अध्यक्ष संजयमामा शिंदे आणि पालकमंत्री विजय देशमुखांचं नाव न घेता यांच्यावर टीका केली.

आज पंढरपूरमध्ये सोलापूर आणि माढा या दोन लोकसभा जागांसाठी भाजपची बैठक झाली. बैठकीला भाजपचे सर्व नेते उपस्थित राहतील अशी अपेक्षा होती. मात्र या बैठकीला विजय देशमुख गटाने पाठ फिरवली. त्यासोबतच पक्षाच्या महासचिव सरोज पांडे यांनीदेखील पाठ फिरवल्याचे दिसले. याप्रकारावर सुभाष देशमुखांनी पालकमंत्री गटातील पदाधिकाऱ्यांना इशारा दिला आहे. भाजपमध्ये आलेल्या पवारप्रेमींना जर त्यांचा प्रचार करायचा असेल तर भाजपमुळे मिळालेल्या पदांचे राजीनामे द्यावे लागतील, असा इशारा त्यांनी यावेळी दिला.

मात्र पालकमंत्री विजय देशमुख यांच्यावर ही जबाबदारी नसल्याने ते आले नाहीत. ते खासदार संसदेच्या अधिवेशनात असल्याचे तोकडे समर्थन करत सुभाष देशमुखांनी वेळ मारून नेली. दरम्यान, माढ्यामधून शरद पवार आणि सोलापूरमधून सुशीलकुमार शिंदे यांच्या उमेदवारीची चर्चा आहे. त्यामुळे सोलापूर जिल्हा भाजपासाठी आव्हान बनलेलं असताना या गटबाजीमुळे भाजप कार्यकर्त्यांत संभ्रम निर्माण होत आहे. या गटबाजीचा परिणाम लोकसभा निवडणुकांवर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता भाजप अंतर्गत मिटवण्याचा प्रयत्न कसा करेल हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like