आमदार दिलीप सोपल यांचा अटक पूर्व जामीन फेटाळला 

बार्शी (सोलापूर) : पोलीसनामा ऑनलाईन – बार्शी तालुक्याचे आमदार माजी मंत्री दिलीप सोपल यांच्यावर बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदावर असताना केलेल्या १ कोटी ५ लाख रुपयांच्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणात अटकपूर्व जामीन फेटाळून लावला आहे. बार्शी येथील अतिरिक्त सत्र न्यायालयात हा जामीनअर्ज करण्यात आला होता त्यावर काल न्यायाधीश आर. एस. पाटील यांनी अटक पूर्व जामीन अर्ज फेटाळत असल्याचा निकाल दिला आहे.

हा निकाल म्हणजे आमदार दिलीप सोपल यांना मोठा हादरा मानला जातो आहे. दिलीप सोपल यांच्या सह अनेक संचालक आणि लेखापाल, रोखपाल आणि रोजदारी व हंगामी कर्मचारीयांचा हि अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. जिल्हा विशेष लेखापरीक्षक विष्णू डोके यांनी १३ जून २०१७ रोजी बार्शी पोलिसात संबधित प्रकरणाची फिर्याद दाखल केली होती.

या फिर्यादी नुसार तत्कालीन बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आमदार दिलीप सोपल, उपसभापती कुंडलिक गायकवाड, सचिव किसन ओव्हाळ, सदस्य महादेव जगताप, अशोक बोधले यांच्यासह इतर सदस्य, लेखापाल, रोखपाल, रोजंदारी कर्मचारी यांनी एकत्रित १ कोटी ५ लाख रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

पोलीस फिर्यादीत नमूद असणारे अपहार 
– शीतगृह भाडेकरारात गैर व्यवहार करून १३ लाख ८० हजार रुपयांचा अपहार
– तसेच गाळेधारक व्यापाऱ्यांनी अतिक्रमणातील भाड्याचे २५ लाख ३६ हजार ,
– विजयालक्ष्मी ट्रॅक्टरचे राहुल कोढारे या व्यक्तीने बाजार समितीच्या जागेवर अतिक्रमणकरून ताबा घेतला ,
– बाजार समितीच्या १०३ कामगारांच्या भरतीत ४७ लाख ४१ हजार
– कर्मचाऱ्यांच्या सुट्टीच्या दिवशीच्या हजेरी लावून १८ लाख ४३ हजार
असा एकूण १ कोटी ५ लाखाचा अपहार केला असे नमूद फिर्यादीत म्हणले आहे.

आमदार दिलीप सोपल यांच्या सह अन्य लोकांनी बार्शी अतिरिक्त सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी अर्ज केला होता. दोन्ही बाजूचा युक्तिवाद  ऐकून घेत आमदार दिलीप सोपल यांच्या सह अन्य सर्व लोकांचा अटकपूर्व जामीन फेटाळून लावला आहे.

या खटल्यात सोपलांच्या विरोधात सरकारी वकील प्रदीपसिंग राजपूत, अ‍ॅड. पी. ए. बोचरे यांनी काम पहिले तर दिलीप सोपल यांच्यासह सर्व संचालकांच्या वतीने अ‍ॅड. मिलिंद थोबडे, अ‍ॅड. भारत कट्टे, अ‍ॅड. अनिल पाटील यांनी काम पहिले. दिलीप सोपल यांच्यावरील भ्रष्टाचाराचे प्रकरण उजेडात आल्याने बार्शी तालुक्यात खळबळ माजली आहे.