सोलापूर मनपा आयुक्त ‘कोरोना’ पॉझिटिव्ह, जिल्हाधिकारी होम ‘क्वारंटाईन’

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन – सोलापूरचे मनपा आयुक्त पी. शिवशंकर यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. 28 जून रोजी मनपा आयुक्तांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती पालकमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी दिली. यापूर्वी सोलापूरमधील लोकप्रतिनीधी देखील कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले होते. तसेच शहराच्या प्रथम नागरिक महापौर श्रीकांचना यन्नम ह्या देखील कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्या होत्या.

शहरातील कोरोना परिस्थिती हाताळताना आयुक्त कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याने प्रशासनात खळबळ उडाली आहे. फिल्डवर जाऊन काम करत असतानाच कोणाच्या तरी संपर्कात आल्याने आयुक्तांना कोरोनाची लागण झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कोरोनाचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला असला तरी त्यांचे काम थांबणार नाही. ते घरून कामकाज पाहणार आहेत. त्याच्या जागी अप्पर आयुक्त म्हणून सोमवारी रुजू झालेले विजय खोराटे यांच्याकडे आयुक्तांचा पदभार सोपण्यात आला आहे.

दरम्यान, आयुक्तांशी दररोज संपर्कात आल्याने विशेष खबरदारी म्हणून जिल्हाधिकारी मिलिद शंभरकर हे देखील होम क्वारंटाईन झाले आहेत. ते घरूनच कामकाज करणार आहेत. सोलापुरातील कोरोना बाधितांची संख्या दररोज वाढत आहे. त्यात कोरोना रोखण्यासाठी प्रयत्न करणारे अधिकाऱ्यांनाच कोरोनाची लागण होत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. मात्र, नागरिकांनी कोणतीही भीती न बाळगता, तसेच अफवांवर विश्वास न ठेवता स्वत:ची काळजी घ्यावी असे आवाहन पालकमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी केले आहे.