भरधाव पिकअपनं पोलिस कर्मचार्‍याला चिरडलं, खूनाच्या गुन्हयात गौस कुरेशीला अटक

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन – ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर विजापूर महामार्गावर वडकबाळ येथे लावण्यात आलेल्या नाकाबंदीतील पोलीस शिपायाच्या अंगावर पीकअप घालून खून करण्यात आल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी मंद्रुप पोलिसांनी पीकअप चालकास अटक केली आहे. रामेश्वर गंगाधर परचंडे (वय ३0, रा. जोडभावी पेठ, सोलापूर) असे खून झालेल्या पोलीस शिपायाचे नाव आहे. त्यांची नेमणूक सोलापूर ग्रामीण पोलीस मुख्यालयात आहे. कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षकांनी वडकबाळ येथे जिल्हाबंदीसाठी नाकाबंदी लावली आहे. या ठिकाणी २२ मे रोजी पहाटे ४ वाजता पोलीस शिपाई परचंडे हे पोलीस नाईक लक्ष्मण कोळेकर, होमगार्ड स्वप्नील गिरी, दिनेश रास्ते यांच्यासह नाकाबंदी करीत होते.

पावणेपाच वाजता तेरा मैलकडून सोलापूरकडे निघालेली एक पीकअप भरधाव वेगाने तिथे आली. पोलीस नाईक कोळेकर यांनी ईशारा करूनही चालकाने पीकअप थांबविली नाही. पीकअपच्या पाठीमागे फळ्या लावलेल्या होत्या व नंबरप्लेट खोडलेली होती. संशय आल्याने पोलीस शिपाई परचंडे व होमगार्ड रास्ते यांनी मोटरसायकलवरून पीकअपचा पाठलाग केला. पोलीस येत आहेत, असे पाहून चालकाने पीकअप समशापूर ते नंदूर रस्त्याने घेतली. महामागार्पासून २00 मीटर अंतरावर परचंडे यांनी पाठलाग करून पीकअप अडविली.चालकाने पीकअप थांबविल्याचे पाहून परचंडे मोटरसायकलवरून खाली उतरून चालकाकडे जात असताना चालकाने पीकअप वेगाने दामटली. यात पीकअपचा धक्का बसून परचंडे खाली पडले व चाक त्यांच्या पोटावरून गेल्याने ते गंभीर जखमी झाले.

होमगार्ड रास्ते यांनी ही माहिती दिल्यावर नाईक कोळेकर घटनास्थळी आले व त्यांनी सपोनि धांडे यांना ही माहिती दिली. धांडे यांनी घटनास्थळी धाव घेऊन खाजगी वाहनातून परचंडे यांना सोलापुरातील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. याप्रकरणी पोलीस नाईक कोळेकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गौस नबीलाल कुरेशी (वय ३१, रा. बाशापेठ, सोलापूर) याच्याविरूद्ध खून करण्याचा प्रयत्न व सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी मंद्रुप पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. तसेच चालक गौस याला अटक केली आहे. उपचार सुरू असताना परचंडे हे आज शनिवार दिनांक 23मे 20 रोजी पहाटे मरण पावले आहेत.त्यामुळे आता चालक गौस याच्याविरूद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे तपास अधिकारी हवालदार शिंदे यांनी सांगितले.

विशेष पोलीस महानिरीक्षकांची भेट
या प्रकरणाची माहिती देताच कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. सुहास वारके यांनी वडकबाळ नाकाबंदी व मंद्रुप पोलीस ठाण्याला भेट देऊन घटनेची माहिती दिली. यापूर्वी नाकाबंदीला असलेल्या कर्मचाऱ्याला कोरोना झाल्याने वडकबाळ चेकपोस्ट चर्चेत आला होता. आता पोलीस शिपायाच्या खूनामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

You might also like