‘मी कधी तुरुंगात गेलो नाही’, शरद पवारांची अमित शहांवर नाव न घेता टीका

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाईन – विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधून आमदार आणि नेते मोठ्या प्रमाणात बाहेर पडत आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला खिंडार पडले असून उमेदवार शोधण्याची वेळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर येणार आहे. मात्र त्यानंतर आता पक्षाध्यक्ष शरद पवार हे संपूर्ण राज्याच्या दौऱ्यावर निघाले आहेत. निवडणुकीच्या तोंडावर होणारी हि पडझड रोखण्यासाठी स्वतः शरद पवार मैदानात उतरले आहेत.

नाशिकमध्ये कार्यकर्त्यांची बैठक घेतल्यानंतर आता शरद पवार राज्याचा दौरा करणार असून सोलापूर जिल्ह्यात भेटीसाठी आले असता त्यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. यावेळी त्यांनी भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्यावर देखील मोठ्या प्रमाणात टीका केली. यावेळी अमित शहा यांना टोला लागवताना त्यांनी म्हटलं कि, मी आयुष्यात अनेक चांगली वाईट कामे केली मात्र तुरुंगात कधी गेलो नाही. अमित शहा यांनी काही दिवसांपूर्वी शरद पवार यांनी काय केले असा प्रश्न विचारला होता. त्यावर उत्तर देताना पवारांनी अमित शहा यांना हा टोला लगावला आहे. तुरुंगात गेलेल्यांनी मी काय केले हे विचारू नये, असा देखील टोला त्यांनी अमित शहा यांना हाणला. यावेळी केलेल्या भाषणात पवारांनी विविध मुद्दे मांडले. त्यांनी आपली राजकीय कारकीर्द हि सोलापूर जिल्ह्यातूनच सुरु झाल्याची देखील माहिती दिली. त्याचबरोबर त्यांनी नुकतेच भाजपमध्ये प्रवेश केलेल्या सोलापूर जिल्ह्यातील मोहिते पाटील, दिलीप सोपल यांच्यावर नाव न घेता टीका केली.

दरम्यान, पक्ष सोडून गेलेल्या आमदार आणि नेत्यांवर देखील त्यांनी यावेळी टीका केली. विधानसभा निवडणुकींनंतर राज्यात वेगळे चित्र असणार आहे, असे देखील त्यांनी सांगितले. त्याचबरोबर पक्ष सोडून गेलेले हे नेते इतिहास जमा होणार असल्याचे देखील शरद पवार यांनी म्हटले.