अन्नाचा घास घशात अडकल्याने बालकाचा गुदमरुन मृत्यू, सोलापूर जिल्ह्यातील घटना

माढा : पोलीसनामा ऑनलाइन – ऐन महाशिवरात्रीच्या दिवशी एका 11 वर्षाच्या मुलाच्या घशात साबुदाना खिचडी खाताना अन्नाचा घास अडकल्याने गुदमरून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. गुरुवारी (दि. 12) सोलापूर जिल्ह्यातील वडाची वाडी (ता. माढा) येथे ही दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

रोहन सिद्धेश्वर निळे (वय 11 वर्ष, रा. वडाची वाडी) असे मृत्यू पावलेल्या मुलाचे नाव आहे. रोहनच्या नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहन हा दिव्यांग होता. त्याला अधून मधून झटकेही येत होते. गुरूवारी महाशिवरात्री निमित्त घरात साबुदाना केला होता. दुपारी 4 च्या सुमारास हा साबुदाना खाताना त्याच्या घशात घास अडकला होता. त्यामुळे त्याला ठसका लागला आणि श्वासोच्छवास घेण्यास अडथळा येऊ लागला तसेच त्याला अस्वस्थ वाटू लागल्याने तातडीने माढ्यातील एका खासगी रुग्णालयात दाखल केले होते. मात्र तत्पूर्वीच त्याचा मृत्यू झाला.