Solapur News : शिक्षकांना सोमवार ते शनिवारपर्यंत शाळेत उपस्थित राहणे बंधनकारक तर रविवारी Online Teaching

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन –   गेल्या वर्षीपासून कोरोनामुळे शाळेला कुलूपच लागले असल्याने ह्या वर्षी काही प्रमाणात शाळा सुरु होत्या परंतु पुन्हा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने शाळा बंद आहेत मात्र शिक्षकांना सोमवार ते शनिवारपर्यंत शाळेत उपस्थिती आवश्यक असून आणि रविवारी सुट्टीच्या दिवशीही शिक्षकांनी घरातून विद्यार्थ्यांचे ऑनलाइन तास घ्यावे, व स्वाध्याय करून घ्यावा असे आदेश शिक्षणाधिकारी संजयकुमार राठोड यांनी काढले आहेत.

१ ली ते २ रीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करताना ३० गुणांची लेखी चाचणी तर ७० गुणांचे अंतर्गत मूल्यमापन होते. ३ री आणि ४ थीच्या वर्गासाठी ४० गुणांचे लेखी तर ६० गुणांचे तोंडी परीक्षा असते. ५ वी ते ६ वीच्या विद्यार्थ्यांचे मूल्यमापन ५० गुण चाचणीचे आणि ५० गुण तोंडी असे होते. ७ वी आणि ८ वीसाठी ७० गुणांची लेखी चाचणी तर ३० गुणांची तोंडी परीक्षा घेतली जाते.तसेच कोरोना महामारीमुळे सवर्च शाळा पुन्हा बंद कराव्या लागल्या असून आता थेट पुढच्या शैक्षणिक वर्षातच शाळा सुरू होणार आहेत. विद्यार्थ्यांना शाळेत बोलावून परीक्षा घेणे सध्या अशक्‍यच आहे. त्यामुळे स्वाध्याय उपक्रम, ऑनलाइन टीचिंगद्वारे वाचन आणि तोंडी चाचणी, याच्या माध्यमातून १ ली ते ८ वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचे मूल्यमापन होईल, असे शालेय शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

शिक्षणाधिकारी राठोड म्हणाले –

शिक्षकांसाठी ५ दिवसांचा आठवडा नाही.

शिक्षकांना सोमवार ते शनिवारपर्यंत शाळेत उपस्थित राहणे बंधनकारकच.

१० वी आणि १२रावी वगळता अन्य शाळा ३० एप्रिलपर्यंत बंद राहणार.

शिक्षकांना रविवार सुट्टी परंतु, विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण द्यावे.

अभ्यास निष्पत्ती आणि विद्यार्थ्यांच्या अंतर्गत मूल्यमापनासाठी स्वाध्याय उपक्रमात सहभाग आवश्‍यक.

स्वाध्याय उपक्रमात ३५ लाख २३ हजार ४५४ विद्यार्थी सहभागी; सोलापूर राज्यात २ ऱ्या क्रमांकावर.

स्वाध्याय उपक्रमातील विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत बार्शी, अक्‍कलकोट पिछाडीवर

दरम्यान, आगामी काळातही विद्यार्थ्यांसाठी शिक्षकांना योगदान द्यावे लागणार आहे. सध्या राज्य शालेय शिक्षण विभागाच्या “स्वाध्याय’ या उपक्रमाअंतर्गत सोलापूर जिल्ह्यातील ३ लाख ६ हजार ३४९ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला आहे. तसेच १ ली ते ५ वीसाठी ७ प्रश्‍न तर ६ वी ते १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी १० प्रश्‍न दिले जातात. मराठी माध्यमातून मराठी, गणित, विज्ञान व सेमी इंग्रजी तर उर्दू माध्यमातून गणित व विज्ञान या विषयांवर प्रश्‍न विचारले जातात. विद्यार्थ्यांची गुणवत्ता त्यांतर्गत जाणून घेतली जात आहे. कोरोना काळात या उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेकडे लक्ष देताना, त्यामध्ये सर्वच विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवावा म्हणून शिक्षकांना सुट्टीतही काम करावे लागणार आहे. तर https://wa.me/918595524519?text=Namaskar या लिंकवरून विद्यार्थ्यांना सहभाग नोंदविता येणार आहे.