Solapur News : मुलगा, सून, नातूनेच वृद्ध आईला लुबाडले; तब्बल दीड कोटीची रोकड आणि दागिने हडपले, चौघांना अटक

सोलापूर : खोट्या प्रतिज्ञापत्राच्या आधारे पतसंस्थेतील ९० लाख रुपये परस्पर ट्रान्सफर केले. त्यानंतर वृद्ध आईला मारहाण करुन घरातील तब्बल १६८ तोळे सोन्याचे दागिने जबरदस्तीने हडपल्याचा प्रकार समोर आला आहे. विजापूर नाका पोलिसांनी मुलगा, सून, नातू यांच्यासह ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून चौघांना अटक केली आहे.

राजशेखर महादेव बागदुरे (वय ५८), राजश्री बागदुरे (वय ५१), शारदा बागदुरे (वय ४१), राकेश ऊर्फ सिद्धेश्वर बागदुरे (वय ३०, रा. उत्तर कसबा), राकेशचा मित्र माशाळ, शिवानंद नागपुरे (दोघे रा. सोलापूर) अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत.
याप्रकरणी भंगारेवा महादेव बागदुरे (वय ८१, रा. नरेंद्रनगर, विजापूर) यांनी फिर्याद दिली आहे. बागदुरे यांनी उमासा नागरी सहकारी पतसंस्थेमध्ये ७० लाख रुपये व संयुक्त खात्यात २० लाख रुपये ठेवले होते. त्यांचा मुलगा, सून व नातूने खोटे प्रतिज्ञापत्र तयार करुन ते पतसंस्थेत सादर केले. त्याद्वारे त्यांनी भंगारेवा यांच्या खात्यातील ७० लाख व संयुक्त खात्यातील २० लाख रुपये राजश्री बागदुरे व शारदा बागदुरे यांच्या नावावर ट्रान्सफर करुन घेतले. त्यानंतर गेल्या वर्षी २५ ऑगस्ट रोजी भंगरेवा बागदुरे यांना मारहाण करुन त्यांच्या अंगावरील १८ तोळे सोन्याचे दागिने जबरदस्तीने काढून घेतले. तसेच उत्तर कसबा येथील घरामध्ये छोट्या तिजोरीत ठेवलेले १५० तोळे सोन्याचे दागिने व ५० तोळे चांदीचे दागिने इतर मौल्यवान वस्तू, खतावणी, कागदपत्रे काढून घेतली. हा प्रकार भंगारेवा यांना नुकताच समजल्याने त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांनी चौघांना अटक केली असून पोलीस निरीक्षक उदयसिंह पाटील अधिक तपास करीत आहेत.