दुर्देवी ! ‘कोरोना’च्या भीतीमुळं मुलानेच वडिलांवर अंत्यसंस्कार करण्यास दिला नकार

सोलापूर :  पोलीसनामा ऑनलाइन –  कोरोनाच्या भितीने वडिलांच्या अंत्यसंस्कार करण्यास मुलाने नकार दिल्यामुळे शेवटी बेवारस म्हणून नगरपरिषदेवर अंत्यसंस्कार करण्याची वेळ आली. ही घटना आज बुधवार 27 मे दिवशी घडली.

नातेवाईक पोहचू शकत नसल्याने अनेक ठिकाणी दुसऱ्यांनी अंत्यसंस्कार केल्याच्या घटना या कोरोना काळात राज्यात घडल्या आहेत. मात्र, उस्मानाबाद जिल्ह्यात पोटच्या मुलानेच वडिलांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यास नकार दिला आहे.

उस्मानाबाद जिल्ह्यात 64 वर्षांच्या एका वृद्धाचा दोन दिवसांपूर्वी मृत्यू झाला. हा व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह नव्हता. मात्र, त्याची पत्नीला कोरोनाची लागण झाल्याचे निदान झाले होते. त्यांच्यावर परंडा उपजिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत. मृताला दम्याचा आजार होता. उपचार सुरू असताना दोन दिवसांपूर्वी हा व्यक्ती मरण पावला. त्यानंतर दोन दिवस वडिलांचा मतदेह ताब्यात घ्यायला मुलाने नकार दिला. मुलाने परंडा पोलिसांत आपनं मतदेहावर अत्यंस्कार करू शकत नाही, असे लिहून दिले. आज दोन दिवस वाट पाहून उस्मानाबाद पालिकेतल्या चार कर्मचाऱ्यांनी अंत्यसंस्कार केले.

कोरोनामुळे पसरलेल्या अवास्तव भीतीमुळे निगेटिव्ह असलेल्या जन्मदात्या पित्याचा मृतदेह ताब्यात घेण्यास पोटच्या मुलानेच नकार दिला. त्यामुळे मृत्यूनंतर दोन दिवस मृतदेह उस्मानाबाद जिल्हा शासकीय रुग्णालयात पडून होता. जन्मदात्या पित्यावर अंत्यसंस्कार करण्यास असमर्थ असल्याचे मुलाने लिहून दिल्यामुळे बेवारस अशी नोंद घेत उस्मानाबाद नगरपालिकेवर अंत्यसंस्कार करण्याची वेळ आली. सोमवारी मयत झालेल्या परंडा तालुक्यातील उकडगाव येथील मयतावर बुधवारी दुपारी येथील कपिलधार स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.