चक्‍क पोलिस स्टेशन समोरच 5000 लाच घेणारा उपनिरीक्षक अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळयात

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन – प्रतिबंधात्मक कारवाई न करण्यासाठी गुन्हा दाखल असलेल्या आरोपीकडून 5 हजार रूपयाची लाच घेणार्‍या पोलिस उपनिरीक्षकाला चक्‍क पोलिस ठाण्याच्या समोरच रंगेहाथ पकडण्यात आले आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) सोलापूर युनिटने ही कारवाई सोमवारी रात्री केली आहे. दरम्यान, पोलिस उपनिरीक्षकास अटक करण्यात आली असुन त्याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अविनाश बाबुराव वाडेकर (30, अक्‍कलकोट उत्‍तर पोलिस स्टेशन, सोलापूर ग्रामीण) असे लाच घेणार्‍या पोलिस उपनिरीक्षकाचे नाव आहे. याप्रकरणी 39 वर्षीय तक्रारदाराने एसीबीकडे तक्रार नोंदविली होती. तक्रारदाराविरूध्द अक्‍कलकोट उत्‍तर पोलिस ठाण्यात भादंवि 365, 323 प्रमाणे गुन्हा दाखल असून त्यामध्ये त्यांना अटक झाली होती. ते जामिनावर मुक्‍त झाले. त्यानंतर त्यांच्याविरूध्द प्रतिबंधात्मक कारवाई न करण्यासाठी तसेच तपासामध्ये मदत करण्यासाठी उपनिरीक्षक वाडेकर यांनी त्यांच्याकडे 5 हजार रूपयाच्या लाचेची मागणी केली होती. सोमवारी रात्री लाच देण्याचे ठरले होते. तक्रारदाराची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी एसीबीकडे तक्रार नोंदविली. तक्रारीची पडताळणी करण्यात आली.

एसीबीच्या अधिकार्‍यांनी अक्‍कलकोट उत्‍तर पोलिस ठाण्याच्या समोरच सापळयाचे आयोजन केले. सोमवारी रात्री सव्वा आठ वाजण्याच्या सुमारास उपनिरीक्षक वाडेकर यांनी चक्‍क पोलिस ठाण्याच्या समोरच तक्रारदार यांच्याकडून 5 हजार रूपयाची लाच स्विकारली. त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले. यावेळी सरकारी पंच उपस्थित होते. पोलिस उपाधिक्षक अरूण देवकर, पोलिस निरीक्षक विता मुसळे, सहाय्यक उपनिरीक्षक जाधवर, पोलिस हवालदार बिराजदार, स्वामी, जानराव आणि पवार यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे. पोलिस निरीक्षक जगदीश भोपळे अधिक तपास करीत आहेत. दरम्यान, चक्‍क पोलिस ठाण्याच्या समोरच पोलिस उपनिरीक्षकाने 5 हजार रूपयाची लाच स्विकारल्यामुळे सोलापूर ग्रामीण पोलिस दलात खळबळ उडाली आहे.