वडिलांच्या सात-बाऱ्यावर ऐतखाऊ पोरांनं दुसऱ्यांना बांडगूळ म्हणू नये : माजीमंत्री लक्ष्मणराव ढोबळे

मोहोळ : पोलीसनामा ऑनलाईन – सगळी बांडगुळं मी सरळ करतो असं म्हणणा-या मालकांना मी हक्कानं एवढेच सांगेन, वडिलांच्या सात बाऱ्यावर ऐतखाऊ पोरानं दुस-याला बांडगूळ म्हणणे बरोबर नाही. त्याची किंमत काय आहे, हे राजन पाटील तुमच्या पक्षाला माझ्या प्रचारातून मोजायला लावीन. वांगं निवडतानासुद्धा किडकं वांगं आपण बाजूला काढतो. त्याप्रमाणे आता तालुक्याचं हे किडकं वांगं बाजूला करण्याची वेळ आली आहे असं झणझणीत वक्तव्य माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनी केले आहे. मोहोळ तालुक्यातील गोटेवाडी येथे भीमा-लोकशक्ती परिवारातील नवनिर्वाचित ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सदस्य व सी. एम. चषकाचा मानकरी समाधान वाघमोडे-पाटील यांचा सत्कार आयोजित केला होता, याप्रसंगी ते बोलत होते.

लक्ष्मणराव ढोबळे म्हणाले, ‘आमदार रमेश कदम मुंबईला म्हणून इथे मीच डमी आमदार म्हणून काम करतो, ही त्यांची कामाची स्टाईल आहे. आता बनसोडेंना आमंत्रण दिले आहे. त्यांचा स्टॉक एक्स्चेंजमध्ये ठेवून पुन्हा हेच राज्यकर्ते होणार आणि तालुक्याच्या राजकारणात मिरवणार. देशासाठी रक्ताच्या बलिदानाची रांगोळी करून, जीवाची बाजी लावून सीमेवर लढवणाऱ्या सैनिकांच्या काळजात शंका निर्माण करण्याचं काम करणाऱ्यांनी बोलताना भान ठेवावं, आदर्शाचा मोरच राष्ट्राच्या चौकीदाराला चोर म्हणतोय, असा खरपूस समाचार घेत माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, माजी आमदार राजन पाटील, आमदार प्रणिती शिंदे यांच्यावर टीकेची झोड उठविली

शिस्त लावण्याची धमक फक्त रमेश कदमांकडेच-

रमेश कदम यांचा महिनाभरात जामीन होईल. तेच पुन्हा मोहोळ तालुक्याचे आमदार होतील. कारण मोहोळ तालुक्याला शिस्त लावण्याची धमक फक्त रमेश कदमांकडेच आहे, असे प्रा. लक्ष्मणराव ढोबळे म्हणाले.रमेश कदम हे सोलापूर लोकसभेसाठी इच्छुक आहेत.

यावेळी जि. प. अर्थ व बांधकाम समिती सभापती विजयराज डोंगरे, शिवसेना तालुकाप्रमुख अशोक भोसले, माजी सभापती यशवंत नरोटे, झेडपी सदस्य तानाजी खताळ, भीमाचे माजी संचालक सुरेश शिवपुजे, नगरसेवक सुशील क्षीरसागर, सर्जेराव चवरे, फंटू गोफणे, वाघोली मिलचे माजी उपाध्यक्ष रामचंद्र खांडेकर, सुनील पाटील, शिवाजी पासले, मुकुंद आवताडे, सागर लेंगरे, भारत घोडके, दत्ता शेळके आदी उपस्थित होते.