सोलापूर रस्ता : रात्री भाजीपाला खरेदी-विक्री सुरूच, लक्ष्मी कॉलनी येथे अपघात सदृशस्थिती

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – सोलापूर रस्त्यावर मांजरी फाटा चौकाजवळच लक्ष्मी कॉलनी येथे दररोज रात्री 8 नंतर भाजीपाल्याच्या टेम्पो, छोटा हत्ती गर्दी होत आहे. यामुळे अपघातसदृशस्थिती निर्माण झाली आहे. याबाबत हडपसर पोलीस आणि पुणे नियंत्रण कक्षाला नागरिकांनी व्हॉट्सअ‍ॅपवर गर्दीचे फोटो पाठविले आहेत, तरीसुद्धा त्यांच्यावर कारवाई केली जात नसल्याचे माजी नगरसेवक शिवाजी पवार यांनी सांगितले.

हडपसर क्षेत्रीय कार्यालयातील अतिक्रमण विभागाचे संजय जाधव म्हणाले की, हे काम आमचे नाही. आमची ड्युटी सहा वाजता संपली आहे. तेथे पोलिसांनी कारवाई केली पाहिजे. आपण या विषयावर सकाळी बोलू. मात्र, रात्री भाजीपाला घेऊन आलेल्यांची रस्त्यावर गर्दी सुसाट धावणाऱ्या वाहनांमुळे अपघातात होऊन जीव गेल्यानंतर ही मंडळी कारवाई करणार का, सोलापूर रस्त्यावर आकाशवाणीपासून पुढील परिसर ग्रीन झोनमध्ये आहे.

तो आता रेडझोनमध्ये आणायचा आहे का. कारण रेडझोनमधून भाजीखरेदी करण्यासाठी व्यापारी-दलाल येथे येतात. त्यांच्यामुळे या परिसरात आणि ग्रामीण भागातही कोरोना व्हायरस पसरू द्यायचा का असा संतप्त सवाल येथील नागरिकांनी उपस्थित केला आहे. संबंधित कामचुकार अधिकाऱ्यांवर प्रशासनाने कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर मार्केट बंद आहे. त्यामुळे सोलापूर रस्त्यावर लक्ष्मी कॉलनी (फिशफार्म) बाजार भरत आहे. लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात शिथिलता आणल्यामुळे वाहनांची वर्दळ वाढली आहे. त्यातच भाजीपाल्याचे टेम्पो रस्त्यात उभे करून खरेदी-वि्क्री केली जात आहे. रस्त्यावरील दिवे बंद असल्याने अंधाराच्या विळख्यात येथे भाजी खरेदी करण्यासाठी शहर आणि परिसरातून टेम्पोंच्या रांगा लागलेल्या असतात. पोलिसांकडे तक्रार करूनही त्यांच्यावर कारवाई केली जात नाही. या ठिकाणी अपघातात जीवित हानी झाल्यानंतर प्रशासन जागे होणार की काय, असा प्रश्न येथील नागरिकांना पडला आहे.

पवार म्हणाले की, कोरोना व्हायरसचा संसर्ग वाढत असून, शहरातील पेठा बंद केल्या आहेत. मात्र, रेड झोनमधील अनेक भाजीपाला खरेदीदार येथे येतात. त्यामुळे ग्रीन झोन आता रेड झोन करायचा आहे का, मार्केट बंद आहे, तर भाजीपाला खरेदी-विक्रीसाठी प्रशासनाने स्वतंत्र व्यवस्था करावी. रस्त्यावर खरेदी विक्री करणाऱ्यांवर पलिसांकडून कारवाई होणे अपेक्षित आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

हडपसर भाजीपाला मार्केट बंद आहे. मात्र, मांजरी उपबाजार सुरू असून, तेथे बारामती, इंदापूर, हवेलीतून येणारा भाजीपाल्याची विक्री होत नाही. त्यामुळे अनेक शेतकरी आणि व्यापारी सोलापूर रस्त्यावरच भाजीपाला खरेदीविक्री करत असल्याचे दिसत आहे. शहरातून भाजीपाला खरेदीसाठी येणारा एखादा कोरोनाबाधित असेल, तर परिसरातील नागरिकांच्या जीविताला त्याचा मोठा धोका आहे. त्यामुळे पोलीस आणि महापालिका प्रशासनाने तातडीने पावले उचलून यावर योग्य ती उपाययोजना करावी, अशी मागणी येथील नागरिकांकडून केली जात आहे.

आता सोलापूर रस्त्यावर वाहनांची प्रचंड वर्दळ वाढली आहे. त्यामुळे लक्ष्मी कॉलनी येथे भाजीपाला खरेदी विक्री करणाऱ्या वाहनांची गर्दी होत आहे. याबाबत स्थानिक नागरिकांनी नियंत्रण कक्षाला फोनवरून माहिती दिली जाते, त्यावेळी पोलीस पाठविले आहेत, असे सांगितले जात आहे. वारंवार तक्रार करूनही धोकादायक स्थितीमध्ये खरेदी-विक्री करणाऱ्या भाजीपाला टेम्पो-छोटा हत्तीवर कारवाई का होत नाही.