दोन्ही किडन्या फेल, 800 वेळा डायलिसिस, सोलापूरातील ‘कवी’ची ‘कोरोना’वर मात

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून राज्यातील सर्वच प्रमुख शहरांमध्ये कोरना विषाणूने थैमान घातले आहे. राज्यातील कोरोना बाधितांची संख्या वाढत असताना कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांची संख्या देखील वाढत आहेत. काही दिवसांपूर्वी 1 महिन्याच्या बाळाने कोरोनावर मात केली. ही बातमी ताजी असतानाच सोलापूरमधील एका ज्येष्ठ कवीने कोरोनावर यशस्वी मात केली आहे. विशेष म्हणजे या कवीच्या मागील सहा ते सात वर्षापासून दोन्ही किडन्या फेल झाल्या आहेत. त्यांच्यावर 800 वेळा डायलिसीस करण्यात आले आहे.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव राज्यासह सोलापूर जिल्ह्यात देखील वाढत आहे. सोलापूरमधील 65 वर्षीय ज्येष्ठ कवी माधव पवार यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली. त्यांनी तात्काळ सोलपूरमधील सिव्हील हॉस्पिटलमध्ये भर्ती होऊन उपचार घेतले. कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांनी निराश न होता इच्छाशक्ती आणि सकारत्मकतेच्या बळावर कोरोनावर मात केली आहे. कोरोनाच्या उपचारांसोबत पवार यांच्यावर डायलिसिस देखील सुरु होते. त्यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांची देखील कोरोना टेस्ट करून त्यांना क्वारंटाईन करण्यात आले. कुटुंबातील सदस्यांचा अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना आठव्या दिवशी घरी सोडण्यात आले.

माधव पवार यांनी एका मराठी न्यूज चॅनलशी बोलताना सांगितले की, सरकारी नियमांचे पालन करा आणि आपल्यामुळे इतरांना आणि इतरांपासून आपल्याला कोरोनाची बाधा होणार नाही याची काळजी घ्या असं आवाहन कवी माधव पवार यांनी केले आहे. मी 16 दिवस जे भोगले त्यावरून तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्ही देखील टेस्ट करून घ्या आणि सरकारने सांगितलेले नियम पाळा.