शिवसेना जिल्हाप्रमुखाच्या स्वागत मिरवणुकीत नोटांची ‘उधळण’

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन – सोलापूर शिवसेनेमधील गटबाजी चर्चेत असताना आता आणखी एक वाद समोर आला आहे. शिवसेनेचे नवे जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे यांच्या स्वागतासाठी मिरवणूक काढण्यात आली होती. या मिरवणुकीमध्ये नोटांची उधळण करण्यात आली असून याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रकारामुळे शिवसेना विरोधकांच्या रडारवर आली आहे.

शिवसेनेचे उपनेते व सोलापूर संपर्कप्रमुख तानाजी सावंत हे मंत्रीपद मिळाले नसल्याने नाराज आहेत. नुकत्याच पार पडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेत सावंत यांनी भाजपला साथ दिली. सावंत यांनी शिवसेनेच्या विरोधात भूमिका घेतल्याने त्यांच्यावर आणि त्यांच्या समर्थकांवर कारवाई करण्याची मागणी होत होती. सोलापूरचे जिल्हाप्रमुख लक्ष्मीकांत ठोंगे – पाटील यांना पदावरून दूर करत पुरुषोत्तम बरडे यांची प्रभारी जिल्हाप्रमुख पदावर निवड करण्यात आली.

पुरुषोत्तम बरडे यांची प्रभारी जिल्हाप्रमुखपदावर निवड झाल्यानंतर सोलापूरमध्ये त्यांच्या स्वागतासाठी मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अतिउत्साही शिवसैनिकांनी नोटांची उधळण केली. नोटांची उधळण करतानाचा व्हीडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. दरम्यान, बरडे यांनी अशा प्रकारे मिरवणुकीत नोटांची उधळण झाली नसल्याचे सांगितले. नोटांची उधळण होताना आपण स्वत: पाहिले नाही. आमचे कार्यकर्ते नोटांची उधळण करणारे नसल्याचे बरडे यांनी म्हटले आहे.

फेसबुक पेज लाईक करा –