…तर भाजपचा राज्यातील एक खासदार कमी होणार ?

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन – सोलापूरचे भाजपचे खासदार डॉ. जयसिद्धेश्वर स्वामी यांच्या जात प्रमाणपत्रावरील तक्रारीचा अंतिम निर्णय येत्या काही दिवसांत जाहीर होणार आहे. खासदार स्वामी यांच्या जात प्रमाणपत्रावर सोलापूर जात पडताळणी समितीकडे तक्रार करण्यात आली होती. या तक्रारीची दखल घेत सुनावणी पार पडली. लोकसभा निवडणुकीत प्रतिज्ञापत्र सादर करताना स्वामी यांनी बेडा जंगम या जातीचा दाखला सादर केला होता. मात्र हे प्रमाणपत्र बनावट असल्याचा आरोप करण्यात आला होता.

प्रमोद गायकवाड, मिलिंद मुळे आणि विनायक कंडकुरे यांनी जयसिद्धेश्वर स्वामींविरोधात तक्रार दाखल केली होती. तक्रार दाखल झाल्यानंतर याप्रकरणाची चौकशी करून दक्षता समितीने अहवाल सादर केला. खासदार स्वामी यांनी पुराव्यांसाठी दाखल केलेला दाखलाही संशयास्पद असल्याचे समितीने अहवालात म्हटले आहे. ज्यामुळे स्वामींची धाकधूक वाढली आहे.

दक्षता समिती तक्रारदारच्या दबावात काम करत असून या प्रकरणाची त्रयस्थ समितीमार्फत चौकशी करण्याची मागणी खासदार स्वामी यांच्या वकीलाने केली आहे. मात्र जिल्हा जात पडताळणी समितीने हा अर्ज फेटाळून लावत सुनावणी पूर्ण झाल्याचे जाहीर केले. दक्षता समितीचा अहवाल मान्य नसून हायकोर्टात जाणार असल्याचे खासदार स्वामी यांचे वकील संतोष नाव्हकर यांनी सांगितले.

सोलापूर लोकसभा मतदारसंघ अनुसूचित जातींसाठी राखीव आहे. जात पडताळणी समितीने जयसिद्धेश्वर स्वामी यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरवले तर त्यांची खासदारकी धोक्यात येऊ शकते. मात्र, त्यांना या विरोधात हायकोर्टात दाद मागण्याचा अधिकार असेल. जयसिद्धेश्वर स्वामी यांनी प्रकाश आंबेडकर यांचा पराभव केला होता.