कमी पैशात हज यात्रेच्या बहाण्याने साडेसात लाखांना गंडा घालणाऱ्या बापलेकाला बेड्या

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाईन – कमी पैशात इस्लाम धर्मामध्ये पवित्र समजल्या जाणारी हज यात्रा घडवून आणण्याच्या बहाण्याने सोलापूरमध्ये २५ यात्रेकरुंना साडेसात लाख रुपयांना गंडा घातला होता. याप्रकरणी बापलेकाला सोलापूर पोलिसानीं बेड्या ठोकल्या आहेत.

सुजात अली शेख आणि शाहवेज शेख अशी अटक करण्यात आलेल्या बापलेकांची नावे आहेत.

दोघा बापलेकांनी कशिश टुर्स अँड ट्रॅवल्सच्या नावाखाली कमी पैशात हजर यात्रा घडवून आणण्याचं अमिष दाखवलं. त्यांच्या अमिषाला बळी पडत २५ जणांनी नावनोंदणी केली. त्यांनी या २५ जणांकडून एकूण साडेसात लाख रुपये घेतले. त्यानंतर त्यांनी बनावट तिकिटे तयार करून व्हाट्सअपद्वारे सर्वांना पाठविली.

मात्र बनावट असल्याचे लक्षात आल्यावर पोलिसांत धाव घेतली. याप्रकरणी मुफ्ती मोहसीन मुन्शी यांनी जेलरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. याप्रकरणी अशाच प्रकारे आणखी २४ जणांची फसवणूक झाल्याचे समोर आले. त्यानंतर पोलिसांनी दोघांना अटक केली असून न्यायालयाने त्यांना ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. याप्रकरणात आणखी कोणाची फसवणूक झाली असल्यास त्यांनी जेलरोड पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.