मागणी : ऊसाची गाडी कारखान्यावर आल्यानंतर सर्वप्रथम वजन अन् मगच नंबर

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन – ऊस घेऊन आलेले वाहन कारखान्यावर आल्यानंतर तत्काळ ऊसाचे वजन करावे त्यानंतर गाळपासाठी वाहनांचा नंबर लावावा, अशी प्रमुख मागणी सोलापूर जिल्हा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केली आहे.

जिल्ह्यातील साखर कारखान्यांच्या गळीत हंगामाला सुरुवात झाली आहे. यंदाच्या हंगामापासून ऊस वजनाबाबत काही बदल करावेत, अशी मागणी संघटनेने केली आहे. यात वजनाची पावती ऑटो जनरेटेड स्वरुपात वेईन्ग मशीनवरील पावती वाहनधारकाला द्यावी, वजन काट्याजवळ माहिती फलक लावण्याची कारखान्यांना सक्ती करावी. काट्याच्या वैधतेबद्दल कोणालाही सॅम्पल वजनाद्वारे खात्री करण्याची मुभा असावी. शेतक-याला वजनाबाबत काही तक्रार करायची असल्यास कोणाकडे करावी याबाबत माहिती दर्शवणारा फलक काट्याशेजारी अधिकाऱ्याच्या भ्रमणध्वनीसह लावावा.

ऊस नियंत्रण आदेशानुसार वजनकाटे इलेक्ट्रानिक व ऑटो जनरेटेड असावेत. वजन करण्याच्या व पावती देण्याच्या प्रक्रियेत मानवी हस्तक्षेप नसावा, वजनाच्या खात्रीसाठी बाहेरच्या काट्यावर वजन केले असता कारखाना असे वाहन नाकारतो याबाबत कारखान्यांना सूचना कराव्यात आदी मागण्या संघटनेच्या वतीने करण्यात आल्या आहेत. याबाबत जिल्हाधिकारी, साखर सहसंचालक, वजनमाप विभाग कार्यालयाला निवेदन देण्यात आले आहे. यावेळी संघटनेच्या युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष विजय रणदिवे, पप्पू पाटील, इकबाल मुजावर, सचिन म्हस्के, सचिन राऊत आदी उपस्थित होते.