राज्यातील MIDC मध्ये सोलार निर्मिती प्लांट उभारावेत; सुनील प्रभूंची मागणी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –   राज्यातील एमआयडीसी किंवा आजूबाजूच्या परिसरामध्ये पडीक जमीन स्वत: खरेदी करुन त्याठिकाणी उद्योजकांना उपयुक्त व फायदेशीर पडेल असे सोलार निर्मित वीज प्लांट उभारावेत अशी मागणी शिवसेना विधमंडळ पक्ष मुख्य प्रतोद आमदार सुनील प्रभू यांनी राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्याकडे केली आहे.

सुनील प्रभू यांनी म्हटले आहे की, एमआयडीसी किंवा परिसरात पडीक जमिनीवर सोलार निर्मिती वीज प्लांट उभारले तर उद्योजकांना कमी दराने किंवा मोफत वीज पुरवठा करता येईल. या वसाहतीतील मध्यम व लघू उद्योजकांना सोलार निर्मित वीजेचा पुरवठा केल्यास उद्योजकांना महावितरणच्या महागड्या वीजेचा पडणारा भार कमी होऊन उद्योजकांना याचा मोठा फायदा होऊ शकेल, असे प्रभू यांनी म्हटले आहे.

राज्यातील उद्योगधद्यांचा विजेचा दर जास्त असल्याने तो उद्योजकांना परवडत नाही. त्यामुळे नुकसानीत उद्योग चालवणे उद्योजकांना शक्य होत नाही. त्यामुळे अनेक लहान-मोठे उद्योग महाराष्ट्रातून स्थलांतरीत होत आहेत. हे प्रमाण जास्त असून हे थांबवण्यासाठी सोलार निर्मित वीज प्लांट करणे हा एक बहु उपयुक्त ठरु शकतो, असेही प्रभू यांनी सांगितले.

एमआयडीसीने अधिसुचित केलेल्या किंवा पडीक जमीनी संपादित करुन सोलार प्लांट उभारल्यास उद्योजकांची वीजेची गरज स्वस्तात किंवा मोफत भागवल्यास अनेक उद्योगधंदे राज्यात अधिक येऊ शकतात. यामुळे राज्यातील बेरोजगारीची संख्या काही प्रमाणात कमी होऊ शकते. याशिवाय उत्पादन शक्ती वाढेल, उद्योगांच्या खर्चात सौर उर्जेमुळे बचत होईल आणि शासनाला महसूल प्राप्त होईल, असा विश्वास प्रभू यांनी यावेळी व्यक्त केला.

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने सौर उर्जा निर्मितीसाठी स्वतंत्र सेल निर्माण करावा व यासाठी अधिकारी कर्मचाऱ्यांची पदे निर्माण करावी आणि प्रथमतः या पदावर या क्षेत्रातील अनुभवी अधिकारी-कर्मचारी यांची प्रतिनियुक्ती करावी अशी सूचना त्यांनी उद्योग मंत्र्यांना केली. तसेच सोलार प्रोजेक्ट राबवण्यासाठी आवश्यक असलेले निर्णयात्मक कार्यवाही लवकरात लवकर करावी, अशी विनंती प्रभू यांनी केली.