बुलडाणा जिल्ह्यातील जवान प्रदीप मांदळे यांना विरमरण

दुसरबीड/बुलडाणा : पोलीसनामा ऑनलाइन – बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा तालुक्यातील पळसखेड येथील जवान प्रदीप साहेबरा मांदळे यांना कर्तव्यावर असताना विरमरण आले. प्रदीप मांदळे हे भारतीय सैन्य दलात महार रेजिमेंटचे जवान होते. जम्मू काश्मिरमधील द्रास टायगर हिल भागात मंगळवारी (दि.15) मध्यरात्री ही घटना घडली. त्यांच्या मृत्युमुळे पळसखेड गावावर शोककळा पसरली आहे.

वडिलांचा आधार हरपल्याने घरात कर्त्या पुरुषाची भूमिका प्रदीप मांदळे निभावत होते. मांदळे हे शहीद झाल्याची माहिती जिल्हा सैनिक कल्याण कर्यालयाला मंगळवारी रात्री कळवण्यात आली. प्रदीप मांदळे यांच्या अचानक जाण्याने मांदळे कुटुंबाला मोठा मानसिक धक्का बसला आहे.

प्रदीप मांदळे हे शहीद झाल्याची बातमी गावात वाऱ्यासारखी पसरली आणि गावातील लोकांना गहिवरुन आले. वडील साहेबराव मांदळे यांनी मोलमजुरी करून मोठा मुलगा प्रदीप, संदीप व सैन्यातच कार्यरत धाकटा मुलगा विशाल यांना शिक्षण दिले. त्यातील प्रदीप 2008-09 मध्ये लष्करात भरती होऊन महार रेजिमेंटमध्ये दाखल झाले. प्रदीप हे विवाहित असून त्यांच्या पश्चात पत्नी कांचन, सुरज, सार्थक आणि जयदीप अशी अपत्ये आहेत.

ती भेट अखेरची

शहिद जवान प्रदीप मादळे हे ऑगस्टमध्ये 15 दिवसांच्या सुट्टीवर आले होते. त्यांनी आपल्या कुटुंबासमवेत काही वेळ सुट्टी घालवली. ही त्यांची अखेरची भेट ठरेल अशी कोणालाही वाटले नव्हते. मात्र ही त्यांची अखेरची भेट ठरली.