Jalna News : बोरगाव बुद्रूक येथील जवानाचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

जालना : पोलीसनामा ऑनलाइन – जालना तालुक्यातील बोरगाव बुद्रूक इथल्या सैन्य दलातील नायब सुभेदार गणेश श्रीराम फदाट (वय 41) हे कर्तव्य बजावत असताना ह्रदयविकाराचे तीव्र झटक्याने गुरुवारी (दि.21) सकाळी 11.15 च्या सुमारास निधन झाले. त्यांच्या मागे आई, वडील, पत्नी, मुलगा, मुलगी, भाऊ असा परिवार आहे.

गणेश फदाट यांना कमांड हॉस्पिटल सिकंदराबाद येथे कर्तव्यावर असतांना विरमरण आले. त्यांचे पार्थिव विमानाने औरंगाबाद येथे येणार आहे. तसेच शुक्रवारी (दि.22) सकाळी 11 वाजता बोरगाव येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. या घटनेमुळे बोरगावसह तालुक्यावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जातेय.

गणेश फदाट यांचा लहान भाऊ दिनेश फदाट हा हि सैन्यदलात कार्यरत आहे. गणेश फदाट यांना मूळातच देशसेवेची आवड असल्याने त्यांनी सैन्यादलातील सेवा पूर्ण केल्यानंतर परत सैन्यदलास विनंती करून सेवाकाळ वाढवून घेतला होता. अशातच नायब सुभेदारपदाची जबाबदारी सांभाळत असताना त्यांचे ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.