सैनिकाचा बाथरूममध्ये संशयास्पदरित्या आढळला मृतदेह, प्रचंड खळबळ

बागपत : पोलीसनामा ऑनलाइन – सैन्यातील एका सैनिकाचा मृतदेह संशयास्पदरित्या बाथरुममध्ये आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. बागपत शहराजवळील बिनौली रोड परिसरातील चरणसिंह विहार येथे रविवारी (दि. 4) सकाळी ही धक्कादायक घटना उघडकीस आली. ही हत्या की आत्महत्या याबाबत प्रश्न उपस्थित केला जात आहे. घटनेची माहिती मिळताच कोतवाली पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला आहे.

मोहित उर्फ गुलाब मुलगा (वय 28 रा. बिनौली ) असे मृत सैनिकाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत मोहित हा गेल्या वर्षभरापासून भाड्याने घर घेऊन पत्नीसह चरणसिंह विहार येथे राहत होता. 2015 मध्ये तो सैन्यात भरती झाला होता. त्याची पोस्टिंग पश्चिम बंगाल येथील बीना गुढी येथे 24 जाट बटालियनमध्ये होती. 6 फेब्रुवारी रोजी तो रजेवर घरी आला आणि तेंव्हापासून तो येथेच राहत होता. रविवारी सकाळी मोहितची पत्नी बाथरूममध्ये जाताच तेथे मोहितचा मृतदेह पाहून तिने आरडाओरडा केला. त्यानंतर घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. कोतवाली पोलीस ठाण्याचे अजय कुमार शर्मा म्हणाले की, मृतदेह ताब्यात घेतला असून घटनेचा तपास सुरु केला आहे. दरम्यान मोहित व्यतिरिक्त त्यांचे बंधू योगेंद्र तोमर, बीएसएफ, अनिरुद्ध सेना आणि मोनू तोमर हे सैन्यात सैनिक आहेत.