घनकचरा व्यवस्थापक प्रमुख डॉ. पैठणकर पुन्हा निलंबित 

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन  – घनकचरा व्यवस्थापन प्रमुख असलेले डॉ. नानासाहेब पैठणकर यांना आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग यांनी पुन्हा निलंबित केले आहे. आयुक्तांचे आदेश त्यांनी धुडकाविल्याप्रकरणी त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली.
डॉ. पैठणकर यांच्यावर उपायुक्तांनी केलेल्या चौकशीत गंभीर आरोप ठेवण्यात आले होते. त्यामुळे पैठणकर यांच्यावर तत्कालीन आयुक्त राहुल द्विवेदी यांनी त्यांच्या निलंबनाची कारवाई केली होती. त्यांची चौकशी पूर्ण होण्याअगोदरच पुन्हा घनकचरा विभागात त्यांची नियुक्ती करून आयुक्तांनी त्यांना पुरावा नष्ट करण्यास प्रयत्न केला, ही बाब ‘पोलीसनामा‘ने उघडकीस आणली.

पैठणकर यांची नियुक्ती चुकीची असल्याची बाब ‘पोलीसनामा’ने लावून झाल्यानंतर हा मुद्दा नगरसेवक, शिवसैनिक व इतरांनी लावून धरला. आरोप होऊ लागल्याने आयुक्त भालसिंग यांनी पैठणकर यांची दुसऱ्या विभागात बदली केली आहे. त्यांना दोनदा आदेश दिले. परंतु त्यांनी घनकचरा व्यवस्थापन विभागातील पदभार सोडला नाही. नवीन नियुक्तीच्या ठिकाणी हजर होण्यास नकार दिला. आयुक्तांनी मेहरबानी दाखवलेले पैठणकर हे आयुक्तांनाच जुनानत नसल्याने आयुक्त भालसिंग संतप्त झाले. त्यांनी पैठणकर यांना पुन्हा निलंबित केले आहे.

 पैठणकर यांना निलंबनाचा आदेश बजावण्यात आला आहे. त्यांची पुन्हा चौकशी होणार आहे. दोन महिन्यात दुसऱ्यांना निलंबनाच्या कारवाईला पैठणकर यांना सामोरे जावे लागले आहे. त्यामुळे मनपा वर्तुळात. खळबळ उडाली आहे.