मोदी खरंच चहा विकायचे का ? त्यांचे मोठे भाऊ म्हणतात…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना विरोधक अनकेदा त्यांचा उल्लेख चायवाला असा करतात. मोदीदेखील त्यांच्या अनेक भाषणांमध्ये त्यांनी चहा विकल्याचे सांगितले आहे. काही वेळा विरोधक असेही सांगतात की, मोदींनी कधीच चहा विकला नाही. उलट ते चहा विकाल्याच्या थापा मारत आहेत. यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मोठे भाऊ सोमाभाऊ यांनी खरं काय ते सांगत भाष्य केलं आहे. आमचे वडिलोपार्जित चहाचे कँटीन होते. तिथे मोदी रविवारी किंवा किंवा सुट्टीच्या दिवशी येत आणि चहा विकत असत असे सोमाभाई यांनी सांगितले आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

याबाबत बोलताना सोमाभाई म्हणाले की, “वडनगर रेल्वे स्टेशनवर आमचे दोन कँटीन होते. एक स्टेशनवर आणि दुसरे स्टेशनच्या बाहेर होते. ही दोन्ही कँटीन वडिलोपार्जित होती, नरेंद्र मोदी तिथे सुट्टीच्या दिवशी आणि रविवारी येत आणि चहा विकत. वडिलांना मदत म्हणून आम्ही ते करायचो. आम्ही सामान्य माणसं आहोत त्यामुळे त्या चहा विकण्याच्या व्यवसायात आम्ही नोकर नेमू शकत नव्हतो म्हणूनच आम्ही भावंडं चहा विकायचो. विरोधकांना जे काही म्हणायचे आहे ते म्हणूदेत नरेंद्र मोदींनी चहा विकला होता हे वास्तव आहे.” असे सोमाभाई यांनी स्पष्ट केले आहे.

मोदी आता स्वत:ला चौकीदार म्हणत आहेत. तुम्ही स्वत:ला चौकीदार मानता का असा सवाल विचारला असता सोमाभाई म्हणाले की, “काही अंशी मी स्वतःला चौकीदार मानतोच. मात्र मी नावापुढे चौकीदार लावत नाही. तसेच नरेंद्र मोदी हे स्वतःला चौकीदार आजच म्हणत नाहीत ते गुजरातचे मुख्यमंत्री होते तेव्हाही त्यांनी हा नारा दिला होता की मी या राज्याचा चौकीदार आहे. मी माझ्या घरात माझी जबाबदारी सांभाळतो मात्र नावापुढे चौकीदार लावलेले नाही. त्याची आवश्यकता मला वाटत नाही. जे भाजपाशी जोडले आहेत त्यांनी नावापुढे चौकीदार लावावे. नावापुढे चौकीदार लावायचे असेल तर माझ्यासाठी ती गौरवाची बाब असेल सोमाभाई यांनी म्हटले आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या निकालाबाबात भाष्य करताना सोमाभाई म्हणाले की, “२०१४ च्या निवडणुकीचा निकाल हा ऐतिहासिक होता तर २०१९ च्या लोकसभा निवडणुकीचा निकाल अति ऐतिहासिक असेल” असेही त्यांनी म्हटले आहे.