राजहट्ट आणि बालहट्टासाठी मेट्रो कारशेडची जागा बदलली ;किरीट सोमय्यांची मुख्यमंत्र्यांवर टीका

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – कांजूरमार्ग मेट्रोशेडप्रकरणी विरोधकांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. काही दिवसांपूर्वी नागपूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मेट्रो कारशेडवरून थेट उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला होता. त्याला रविवारी फेसबुक लाईव्हद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधत मेट्रो कारशेड आणि कांजूरमार्ग याबाबतही सविस्तर भाष्य करताना विरोधकांना प्रत्युत्तर दिलं. त्यानंतर, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंना प्रतिप्रश्न केले आहेत. तसेच भाजपाच्या इतर नेत्यांनीही उद्धव ठाकरेंच्या निर्णयावर टीका केली. दरम्यान केवळ राजहट्ट आणि बालहट्टासाठी मेट्रो कारशेडचा निर्णय घेण्यात येत असल्याचा गंभीर आरोप माजी खासदार आणि भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी ट्विटर अकाऊंटवरुन केला आहे.

ठाकरे सरकारच्या समितीनेच दिलेल्या अहवालातून स्पष्ट सांगण्यात आले आहे की, मेट्रो कारशेडचा प्रकल्प कांजूरमार्गला हलविल्यास 4 वर्षांचा विलंब होईल. तरीही, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केवळ बालहट्ट आणि राजहट्टासाठी हा प्रकल्प कांजूरमार्गला हलविण्याचे आदेश दिले आहेत. असे किरीट सोमय्या यांनी म्हटले आहे.

अहवाल सार्वजनिक करा
मेट्रो कारशेडच्या मुद्द्यावरुन राज्याचं होणारं नुकसान सांगत उद्धव ठाकरेंना अहंकारी असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी संबोधलं होतं. त्याला उद्धव ठाकरेंनी फेसबुक लाईव्हद्वारे प्रत्युत्तर दिलं. त्यानंतर, फडणवीस यांनी पुन्हा एकदा ही श्रेयवादाची लढाई नसून भविष्यात कोणतीही अतिरिक्त जागा कारशेडसाठी लागणार नसताना दिशाभूल कशाला? असा प्रश्न फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना विचारला आहे. तसेच, ३० मिनिटांच्या संवादातून एक बाब प्रकर्षाने जाणवते ती म्हणजे अजूनही आपण महाविकास आघाडी सरकारच्याच उच्चाधिकार समितीचा अहवाल पूर्णतः वाचलेला नाही. एकदा हा अहवाल सार्वजनिक करा. प्रत्यक्ष स्थिती, भूमिका, वास्तविकता जनतेसमोर येईल. या समितीनेच सांगितले की कांजूरमार्ग येथे कारशेड नेल्यास किती मोठे आर्थिक नुकसान होईल. शिवाय ४ वर्षांचा विलंब वेगळा. कांजूरमार्ग येथे कारशेड करायचे असेल तरीसुद्धा आरेमध्ये बांधकाम करावेच लागेल हे का लपवून ठेवता? असेही फडणवीस यांनी सांगितले होते.

शरद पवार प्रॅक्टीकल
मेट्रो होऊ नये असं कोणाचंच मत नाही. या मेट्रो प्रकल्पात आम्ही भावनिकदृष्ट्या जुडलेलो आहोत, मी स्वत: मेहनत करुन ८० टक्के टनलिंगचं काम त्या काळात पूर्ण केलंय. त्यामुळेच पवारसाहेब जर मोदींशी बोलून यासंदर्भात चर्चा करणार असतील, तर त्यांचं स्वागतच आहे. उद्धव ठाकरेंनीही मोदींशी चर्चा करावी. हे पहा, शरद पवार आणि आमचे कितीही वैचारिक मतभेद असले तरी, पवारसाहेब जेव्हा तो अहवाल वाचतील, तेव्हा ते प्रॅक्टीकल निर्णय घेतील, पवारसाहेब कधीही चुकीचा निर्णय घेणार नाहीत, असा आशावाद फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.