किरीट सोमैय्याच्या गाडीत पकडली गावठी दारू; फिल्मी स्टाईलने पाठलाग

ठाणे : पोलीसनामा ऑनलाईन

ट्रकच्या टायर ट्यूबमधून गावठी दारूची तस्करी करणाऱ्या दारूमाफिया किरीट सौमय्या याला ठाणे वाहतूक पोलिसांनी ‘फिल्मी स्टाईल’ पद्धतीने पाठलाग करून घोडबंदर रोड येथे आज अटक केली. मुंबई – अहमदाबाद महामार्गावरील ‘चारोटी’ नाक्यावरून हा साठा घेऊन घोडबंदर रोडवरून किरीट मुंबईच्या जुहूकडे निघाला होता. पोलिसांनी १४ टायर ट्यूब दारू जप्त केली आहे.

जोगेश्वरीच्या गुंफा रोड येथील भावेनगर भागात राहणारा किरीट रामजीभाई सौमय्या (वय ६६) हा कारच्या डिक्कीमधून टायर ट्यूबमध्ये गावठी दारूची नेहमीच वाहतूक करतो. रविवारी पोलिस कर्मचारी निलेश गजरे व त्यांचे सहकारी पोलीस कॉन्स्टेबल धनाजी जाधव नागला बंदर येथे नाकाबंदी करत होते. यावेळी किरीटच्या गाडीच्या काळ्या काचा पाहून गजरे यांनी त्याला रोखले. मात्र न थांबता सुसाट वेगात निघालेल्या किरीटचा वाहतूक पोलिसांना संशय आल्याने त्यांनी त्याचा बाईकवरून पाठलाग करण्यास सुरवात केली.आणि यानंतर सुरु झाला चोर पोलिसांचा खेळ.

सोमय्या पुढे, पोलीस मागे-
दारू घेऊन निघालेला सोमय्या पुढे आणि पोलीस मागे असा पाटलाग सुरु झाला. पोलीस दुचाकीवर आणि किरीट चारचाकी घेऊन असा पाठलाग सुरु होता अखेर घोडबंदर रोड येथील विजय गार्डनच्या सिग्नलला वाहतूक कोंडी झाल्याने कॉन्स्टेबल कदम यांनी बाईकवरून उतरून त्याला रोखण्यासाठी धडपड केली. मात्र त्याने कदम यांना धडक देत पुढे जाण्याचा प्रयत्न केला असता गजरे यांनी त्याच्या गाडीची चावी काढून घेत त्याला गाडीबाहेर काढले. पोलिसांच्या या कामगिरीमुळे या कर्मचाऱ्यांचे पोलीस खात्यासह सर्वत्र कौतुक होत आहे.