पॉलिटेक्निकच्या पदाधिकाऱ्यांविरुद्ध बलात्कार, गर्भपाताचा गुन्हा

चंद्रपूर : पोलीसनामा ऑनलाईन – महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष व सौमय्या पॉलिटेक्निकचे संचालक पीयूष पांडुरंग आंबटकर यांच्याविरुद्ध लग्नाचे आमिष दाखवून सलग दीड वर्षे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी बलात्काराचा तर संस्थाध्यक्ष पांडुरंग आंबटकर व त्यांचे जावई अमोल रघाताटे यांच्या विरुद्ध जबरदस्तीने गर्भपात केल्याचा गुन्हा नागपुरातील सोनेगाव पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आल्याने शैक्षणिक वर्तुळात खळबळ उडाली आहे. आंबटकर यांच्या विरुद्ध जिल्ह्यातील बहुतांश पोलीस ठाण्यात इतरही गुन्हे दाखल आहेत. मनसे महिला सेनेने सहकार्य घेऊन पीडित मुलीने या प्रकरणाला वाचा फोडली आहे.

चंद्रपूर प्रेस क्लबमध्ये मनसे महिला सेनेच्या सुनीता गायकवाड, प्रतिमा ठाकूर व मेश्राम यांनी पीडित मुलीसह या बलात्कार, गर्भपाताची संपूर्ण घटना पत्रकारांसमक्ष मांडली. पीडित मुलगी ही नागपूरची रहिवासी असून ती कॉलेजमध्ये उच्च शिक्षण घेत आहे. तिची व पीयूष आंबटकर यांची ओळख दीड वर्षांपूर्वी झाली होती. या ओळखीचे रूपांतर प्रेमात झाल्यानंतर पीयूषने लग्नाचे आमिष देत तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. यामुळे तिला दिवस गेले. याची माहिती पीयूषला समजताच त्याने हात झटकत लग्नास स्पष्ट नकार दिला. पीयूषचे वडील पांडुरंग आंबटकर यांनी पीडितेला जीवे मारण्याची धमकी देऊन प्रकरण संपवण्यास सांगितले. वारंवार लग्नाची विनंती केल्यानंतरही नकार मिळाला. दरम्यान, गर्भ चार महिन्याचा झाला.

त्यानंतर एके दिवशी पीयूषचे वडील व त्यांचे जावई अमोल रघाताटे, किशन पवार घरी आले व विम्स हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. तिथे पांडुरंग आंबटकर यांनी डॉक्टरांशी संगनमत करत शरीरात हिमोग्लोबीन कमी आहे, तपासणी करायची आहे असे सांगून पीडितेचा गर्भपात केला. यानंतरही आंबटकर यांना भेटण्याचा प्रयत्न केला, परंतु काही केल्या ते भेटत नव्हते. शेवटी १९ ऑक्टोबर रोजी नागपुरातील सोनेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. प्राप्त तक्रारीच्या आधारावर सौमय्या पॉलिटेक्निकचे संचालक पीयूष आंबटकर यांच्या विरुद्ध बलात्काराचा गुन्हा पोलिसांनी दाखल केला आहे. संस्थाध्यक्ष व आरोपीचे वडील पांडुरंग आंबटकर व अमोल रघाताटे यांच्या विरुद्ध जबरदस्तीने गर्भपात केल्याचा व जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.