भाजपाला पाठिंबा देणारे काही अपक्ष आमदार शिवसेनेच्या संपर्कात, सेना अधिक ‘शक्तीमान’ बनणार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. एकीकडे शिवसेनेचे नेते 5.30 वाजता राज्यपालांच्या भेटीला जाण्याची शक्यता असताना दुसरीकडे काही अपक्ष आमदार शिवसेनेच्या संपर्कात असल्याची चर्चा रंगली आहे. भाजपला पाठिंबा देणारे काही अपक्ष आमदार शिवसेनेच्या संपर्कात असल्याचे समजते आहे. हे आमदार उद्धव ठाकरेंना भेटण्याच्या प्रयत्नात आहेत.

शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस हे सत्तास्थापनेच्या दिशेने पावले उचलताना दिसत असताना सत्तेपासून दूर गेलेल्या भाजपला पाठिंबा देणारे काही अपक्ष आमदार आता शिवसेनेच्या संपर्कात असल्याचा दावा होत आहे. सत्तास्थापनेकडे वाटचाल करत असल्याने आता शिवसेनेचे संख्याबळ वाढण्याची शक्यता दिसत आहे.

काही वेळाने राष्ट्रवादी, काँग्रेसची संयुक्त बैठक पार पडणार आहे. यानंतर शिवसेनेला पाठिंबा देण्यासंबंधित निर्णय समोर येईल. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस काय भूमिका घेतात याकडे लक्ष आहे. राष्ट्रवादीने तर भूमिका घेतल्याचे दिसत आहे परंतू काँग्रेसची भूमिका अजून अस्पष्ट आहे. शिवसेनेला सत्तास्थापनेचे आमंत्रण राज्यपालांकडून देण्यात आले आहे. असे असताना सत्ता स्थापनेचा दावा करण्यासाठी शिवसेनेला दिलेल्या वेळेनुसार आता फक्त 3 तासच शिल्लक आहेत. परंतू एकीकडे शिवसेनेचे नेते राज्यपालांची भेट घेऊन सत्ता स्थापनेचा दावा करण्यास वेळ वाढवून द्यावा याची मागणी करण्यासाठी चालले असल्याचे सांगितले जात आहे.

परंतू सत्तास्थापनेपासून काही पावले दूर असताना आता अपक्ष आमदार शिवसेनेच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे. अशा वेळी या आमदारांचा पाठिंबा शिवसेनेला महत्वाचा ठरु शकतो. त्यामुळे हे अपक्ष आमदार शिवसेनेला पाठिंबा देतात का हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

Visit : Policenama.com