राज ठाकरे यांना राजकीय धक्का; मनसेच्या पदाधिकार्‍यांचा शिवसेनेमध्ये प्रवेश

कल्याण : पोलीसनामा ऑनलाइन – कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेने डोंबिवलीतील मनसेला धक्का बसला आहे. मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष आणि डोंबिवली शहराध्यक्ष राजेश कदम यांच्यासह मनसेच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत वर्षा निवासस्थानावर शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय.

पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी विरोधकांना आपले करुन राजकीय खेळी खेळत मनसेची हवा निवडणुकीपूर्वीच गुल केलीय. यामुळे मनसेला मोठा राजकीय धक्का बसलाय.

मनसेचे कदम यांच्यासह मनसे विद्यार्थी संघटनेचे सागर जेधे, कल्याण तालुकाध्यक्ष अजरुन पाटील, दीपक भोसले आदी कार्यकत्र्यानी शिवसेनेत प्रवेश केलाय. कदम हे पूर्वी शिवसेना पक्षात होते. मनसेची स्थापना झाली त्यादिवपासून ते संस्थापक सदस्य होते. 2009 साली त्यांनी डोंबिवली विधानसभा मतदार संघातून विधानसभेची निवडणूक लढविलीय.

विविध कल्पक आंदोलने करुन महापालिकेतील शिवसेना भाजप युतीला कायम जाब विचारून धारेवर धरतात, अशी कदम यांची प्रतिमा आहे. मनसेचा सच्चा कार्यकर्ता अशी त्यांची ओळख होती. आज त्यांनी शिवसेनेत प्रवेश केलाय. शिवसेनेने मनसेचाच मोहरा हिरावून घेतलाय. शिवसेनेच्या विरोधात असलेल्या कदम यांना आपले करण्याची किमया शिंदे पिता-पुत्रंनी साधलीय. त्यांच्या किमयेमुळे मनसेला मोठा धक्का बसलाय.

यावेळी कदम म्हणाले, महाराष्ट्राला विकासाकडे घेऊन जाणारे संयमित नेतृत्व उद्धव ठाकरे यांचेच आहे. त्यासह विरोधात असताना कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांचे काम पाहिले. त्यांनी पत्री पूलाचे काम मार्गी लावत असताना मेहनत घेतलीय. तसेच खासदार म्हणून त्यांनी उत्तम काम केलंय. आता आगामी काळात पक्षप्रमुख आणि पक्ष जी जबाबदारी देईल, ती पार पाडेन, असेही कदम यांनी सांगितलं. तर, मनसेच्या पदाधिकार्‍यांनी शिवसेनेत प्रवशे केल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी हि प्रतिक्रिया दिलीय.

याबाबत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले, मला वाटतं राजेश कदम जे बोलले ते पुरेसं आहे. त्यांचं सर्वांचं पक्षात स्वागत आहे. शिवसेनेची ताकद ही कल्याण- डोंबिवलीमध्ये आहे. ती आता अधिक वाढतेय. राज्यातील अनेक ठिकाणी देखील शिवसेनेत अनेकजण प्रवेश करताहेत. त्यांच्या ज्या अपेक्षा आहे, त्या पूर्ण करण्यासाठी पक्षाकडून वाव दिला जाईल.

प्रवेशासंदर्भात मनसेचे आमदार राजू पाटील यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी सांगितले, दोन दिवसापूर्वी या सगळ्यांना घेऊन पक्षाचे प्रमुख राज ठाकरे यांच्याकडे गेलो होते. त्यावेळी त्यांनी कोणत्याही प्रकारची नाराजी व्यक्त केली नाही. अचानक त्यांनी आज शिवसेनेत केलेला प्रवेश हा अनाकलनीय आहे.