अजित पवारांची आगपाखड, म्हणाले – ‘काही जण चुका करत देखील असतील पण त्याची किंमत सगळयांनीच मोजायची का ?’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावरील बलात्काराच्या आरोपावरून अनेक दिवस राजकारणात खळबळ उडाली होती. धनंजय मुंडे यांच्यावर रेणू शर्मा या महिलेने बलात्काराचे आरोप केले होते. परंतु रेणू शर्मा या महिलेने कौटुंबिक कारण देत धनंजय मुंडे यांच्याविरुद्ध पोलिसांकडे दाखल केलेली तक्रार मागे घेतली आहे. यानंतर धनंजय मुंडे यांच्यावर टीका करत राष्ट्रवादीवर निशाणा साधणाऱ्यांचा आता राष्ट्रवादी मधील नेत्यांनी चांगलाच समाचार घेतला आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी धनंजय मुंडे प्रकरणावरून आता विरोधकांवर निशाणा साधला आहे. पुण्यात अजित पवार याच्या उपस्थितीत आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर अजित पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले, ज्या व्यक्तींनी धनंजय मुंडें यांच्या राजीनाम्याची मागणी केली, त्यांच्याविरुद्ध ना ना तऱ्हेचे वक्तव्य केले, आता त्याला जबाबदार कोण? असे ते म्हणाले.

पुढे अजित पवार म्हणाले कि, धनंजय मुंडे यांना आम्ही पाठीशी घालतोय असे आमच्यावर आरोप झाले. पण त्यावेळी आम्ही या प्रकरणाचा संपूर्ण तपास होऊ द्या, सत्य बाहेर येऊ द्या म्हणत होतो. पण धनंजय मुंडे आणि आमच्या पक्षाची बदनामी झाली. मात्र अशा आरोपांमुळे बहुजन समाजातून पुढे आलेला एक सहकारी बदनाम होतो. त्याचं कुटुंब डिस्टर्ब होतं, त्याला वाली कोण? मान्य आहे की काही लोक चुका करत असतील पण त्याची किंमत सगळ्यांनीच मोजायची का? एखादी राजकीय व्यक्ती प्रचंड काम करत एखाद्या पदापर्यंत पोहचते. त्यासाठी अफाट कष्ट घ्यावे लागतात. पण असं काही जेव्हा घडतं तेव्हा त्याला एक क्षणात पायउतार व्हावे लागते. याचा सगळ्यांनी गांभीर्याने विचार करायला पाहिजे असेही पवार यावेळी म्हणाले. तसेच ‘सिरम’मध्ये सकाळपासून तपासणी सुरू आहे. आग नेमकी कशामुळे लागली ते शोधलं जाईल. काहीच लपवले जाणार नाही असेही अजित पवार यांनी यावेळी सांगितले आहे.