home page top 1

‘व्हायरल चेक’ : मुंबई, बिहारचे खड्डे चक्क दौंडमध्ये ! खोटे फोटो टाकून कार्यकर्ते म्हणतात हाच 1200 कोटींचा विकास का ?

दौंड : पोलीसनामा ऑनलाईन (अब्बास शेख) – दौंड तालुक्यातील रस्त्यांवर मुंबई आणि बिहारचे खड्डे अवतरले आहेत. विश्वास बसत नाही ना पण हे खरं आहे. विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आणि त्यामुळे आता आरोप-प्रत्यारोप आणि प्रचारालाही सोशल मीडियावर जोर चढला आहे. या आरोप-प्रत्यारोपामधून अनेक चमत्कारिक किस्सेही घडू लागले आहेत. याचाच प्रत्यय काल अनेकांना आला आहे.

२०१४ साली विधानसभा निवडणुकीत विजयी झालेल्या विद्यमान आमदार राहुल कुल यांनी गेल्या पाच वर्षांमध्ये आपण विविध योजनांच्या माध्यमातून सुमारे १४०० कोटी रुपये निधी आणून दौंड तालुक्यामध्ये विकासकामे केली असल्याचे सांगत त्याचे पुरावे देत आहेत परंतु त्यांनी विकासकामे केलीच नाही हे सांगण्यासाठी विरोधकही आता चांगलेच आक्रमक झालेले दिसत आहेत आणि त्यातूनच मग विकास झाला नाही याचे पुरावे काही कार्यकर्त्यांकडून फोटो सह सोशल मीडियावर टाकले जात आहेत.

दौंड तालुक्यामधील रस्त्यांची कशी चाळण झाली आहे, जागोजागी कसे खड्डे पडले आहेत याचा पुरावा देत काही कार्यकर्त्यांनी काल सोशल मीडियावर दौंड तालुक्यातील रस्ते आणि खड्ड्यांचे फोटो अपलोड केले आणि हाच का १२०० कोटींचा विकास असे प्रश्न विचारू लागले. हे फोटो पाहून खरच दौंडच्या रस्त्यांची किती वाईट अवस्था झाली आहे असे अनेकांना वाटले आणि जर विकास कामे झाली आहेत तर मग हे काय आहे! असे एक ना अनेक प्रश्न विचारले जाऊ लागले परंतु फोटोंबाबत ते फोटो नेमके कोणत्या गाव, शहर किंवा रस्त्याचे आहेत हे सांगण्यात आले नव्हते आणि नेमक्या याच गोष्टीची शंका येऊन काहींनी याची खातरजमा करण्यासाठी ज्यावेळी गुगलवर जाऊन सत्य परिस्थिती चेक केली त्यावेळी हे खड्डे दौंडमधील नसून चक्क मुंबई आणि बिहारच्या रस्त्यावरील असल्याचे समोर आले आणि अन्य शहर आणि राज्यांतील खोटे फोटो टाकून  निवडणुकीच्या तोंडावर दौंडकरांची दिशाभूल केली जात असल्याचे समोर आले.

वास्तविक पाहता सत्ताधारी आणि विरोधकांनी आपापली कामे नेटाने केलीच पाहिजेत परंतु केवळ राजकारण म्हणून किंवा बदनामी करण्याच्या उद्देशाने केले जाणारे असले प्रकार हे विरोधकांना अंतर्मुख करून सत्ताधाऱ्यांना एक प्रकारे मदत केल्या सारखेच ठरत असतात हे मात्र नक्की.

Visit :- policenama.com

Loading...
You might also like