‘सोमेश्वर’कडून कार्यक्षेत्रातील अतिवृष्टीने नुकसान झालेल्या ऊसाची पाहणी सुरू

नीरा : पोलीसनामा ऑनलाइन ( मोहंम्मदगौस आतार) –   सोमेश्वर सह.साखर कारखाना कार्यक्षेत्रात गेल्या ४-५ दिवसांत वादळी वा-यासह मोठा पाऊस झाला. या पाऊसामुळे ब-याच ठिकाणी वाढलेले ऊस पडले असून यामुळे सभासद शेतक-यांचे नुकसान झाले आहे. कार्यक्षेत्रात जो वाढलेला ऊस पडला आहे. त्याचे कारखानाच्या शेतकी विभागाकडून पाहणी सुरू असून या बाबतचा अहवाल शेतकी खात्याकडून प्राप्त झाल्यानंतर संचालक मंडळाच्या बैठकीत याबाबत योग्य तो निर्णय घेण्यात येईल अशी माहिती सोमेश्वर सह. साखर कारखान्याचे चेअरमन पुरुषोत्तम जगताप यांनी दिली.

जगताप यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, कारखाना परिसरात वादळी वा-यासह झालेल्या पावसामुळे सभासद शेतक-यांच्या ऊसाचे ऊस पिकाचे नुकसान झाले आहे. याबाबत शासनाच्या कृषि विभाग व महसूल विभागाच्या मार्फत सर्वेक्षण सुरू आहे. परंतु शेतकरी बांधवांच्या ऊसाचे झालेल्या नुकसानीचे सर्वेक्षण करणे हे कारखान्याचेही कर्तव्य असल्याने कारखान्याच्या शेतकरी विभागासही सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले आहेत. याबाबत लवकरच संचालक मंडळाच्या बैठकीत निर्णय घेऊ.

जगताप पुढे म्हणाले कि, येणारा हंगाम सुरू करण्याच्या दृष्टिकोनातून सर्व कामे गतीने सुरू असून आपणा सर्वांच्या सहकार्याने येणारा ,गाळप हंगामही यशस्वीरित्या पार पाडू असा विश्वास आहे. तसेच तोडणी वाहतूकीचे करारही कारखान्यामार्फत झाले असून अँडव्हान्सदेखील दिला असल्याची माहिती चेअरमन पुरुषोत्तम जगताप यांनी दिली.