‘सोमेश्वर’ एकरक्कमी एफआरपी सभासदांच्या खात्यावर वर्ग करणार : पुरूषोत्तम जगताप

नीरा : पोलीसनामा ऑनलाइन – बारामती तालुक्यातील सोमेश्वरनगर येथील श्री. सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या चालू गाळप हंगामाकरीता गाळपास आलेल्या संपुर्ण ऊसाची प्रतिटन २ हजार ८०८ रुपये एकरकमी एफ. आर. पी सभासदांच्या खात्यावर वर्ग करण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला असल्याची माहिती सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन पुरुषोत्तम जगताप यांनी दिली.

जगताप यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले कि, कोरोना, लॉकडाऊन अतिवृष्टी या एकापाठोपाठ आलेल्या अडचणीतून शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्याच्या उद्देशाने राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली संचालक मंडळाने ३० नोव्हेंबरपर्यंत गाळपाला आलेल्या संपुर्ण ऊसाची एकरकमी एफआरपी सभासदांच्या बँक खात्यावर वर्ग करण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला असून लवकरच ही रक्कम सभासदांना अदा केली जाईल.

जगताप म्हणाले कि, कारखान्याने (दि.३) अखेर २ लाख ८ हजार ३४५ मे. टन ऊसाचे गाळप केले असून संपुर्ण पुणे जिल्ह्यात क्रमांक एकचा १०.३० टक्के साखर उतारा मिळवित २ लाख १० हजार ६०० साखर पोत्यांचे उत्पादन घेतले आहे. तसेच कारखान्याच्या को-जनरेशन मधून १ कोटी ९० लाख ५८ हजार ३३९ युनिट्स वीजनिर्मिती केली असून १ कोटी २७ लाख ३० हजार युनिट्स वीज विक्री केली आहे. त्याचबरोबर कारखान्याच्या डिस्टीलरी प्रकल्पातून सरासरी २७२.४२ ची रिकव्हरी मिळवित १४ लाख ९६ हजार ६०५ लिटर्स अल्कोहोलचे उत्पादन घेतले असून २ लाख ५५ हजार ९६ लिटर्स इथेनॉलची निर्मिती केलेली आहे.

श्री. सोमेश्वर कारखान्याकडे ३३ हजार एकर ऊस क्षेत्राची नोंद झाली असून या गाळप हंगामात अंदाजे १२ लाख मे.टनाच्या आसपास गाळपासाठी ऊस उपलब्ध होण्याची शक्यता कारखान्याच्या शेतकी विभागाने वर्तविली आहे. या हंगामात अतिरिक्त ऊसाचा प्रश्न कारखान्यासमोर आहे. यापैकी काही ऊस इतर कारखान्यांना देण्याचा संचालक मंडळाचा प्रयत्न असून उर्वरीत संपुर्ण ऊस वेळेत गाळप करण्याचा संचालक मंडळ प्रयत्न करीत आहे. कारखान्याकडे पुरेशी ऊसतोड यंत्रणा दाखल झाली असून हार्वेस्टर यंत्रानेही सभासदांची ऊसतोड सुरळीत सुरु आहे. अडीअडचणीच्या प्रत्येक वेळी सभासद व कारखाना हे दोघेही एकमेकांसाठी उभे राहत असून “अभिमान याचा, सोमेश्वर माझा” या उक्तीप्रमाणे आपली संस्था वाटचाल करत असल्याचे गौरवोद्गार सभासदांमध्ये असून याचा संचालक मंडळास सार्थ अभिमान असल्याचे चेअरमन जगताप यांनी सांगितले.

जगताप पुढे म्हणाले कि, कारखान्याकडे अतिरिक्त ऊसाचा प्रश्न कायमचा निकाली काढण्यात येईल. कारखान्याची दैनंदिन गाळप क्षमता हंगामात ७५०० मे. टन प्रती दिनी वाढविण्याचा निर्णय घेतला असून त्याबरोबर कारखान्याने डिस्टीलरीचा वाढीव प्रकल्प हाती घेवून ज्यादा क्षमतेने इथेनॉल निर्मिती करुन सभासदांना अधिकचा मोबदला कसा देता येईल याचाही संचालक मंडळ प्रयत्न करत आहे. गतवर्षीप्रमाणे आपणा सर्वांच्या सहकार्याने सुरु असणारा चालू गाळप हंगामही आपण सर्वच बाबतीत यशस्वीरित्या पार पाडू असा विश्वास चेअरमन जगताप यांनी व्यक्त केला.