‘सोमेश्वर’ दिवाळीसाठी सभासदांना 100 रूपये , कामगारांना देेणार 15 % बोनस तर गत हंगामाचा अंतिम दर 3000 रूपये : पुरूषोत्तम जगताप

नीरा : पोलीसनामा ऑनलाइन – श्री. सोमेश्वर सह. साखर कारखान्याने गत हंगामात गाळप झालेल्या ऊसास १०० रूपये प्रति मे. टन व कामगारांना दिवाळीकरिता १५ टक्के अँडव्हान्स बोनस देण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला असल्याची माहिती ‘सोमेश्वर’चे चेअरमन पुरूषोत्तम जगताप यांनी दिली.

सोमेश्वरनगर ( ता. बारामती) येथील सोमेश्वर सह. साखर कारखान्याने गत हंगाम सन २०१९ – २० मध्ये गाळप झालेल्या ऊसाकरिता एफआरपी २७८८.५१ रूपये प्रति मे .टन . इतकी आलेली असून सदर गाळप हंगामामध्ये कारखान्याने एकूण ९ लाख ३४ हजार मे.टन. ऊसाचे गाळप केलेले आहे. तसेच गत हंगाम सन २०१९-२०.मध्ये गाळप झालेल्या ऊसास आजपर्यंत २ हजार ९०० रूपये प्रति मे.टन. या प्रमाणे केन पेमेंट अदा केले आहे.

गत हंगामातील अंतिम ऊस दराचा २ नोव्हेंबर रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत झालेल्या निर्णयास अनुसरून दिवाळी सणाकरिता आडसाली ऊसाकरिता प्रति मे.टन. १०० रूपये, पुर्व हंगामी ऊसाकरिता १७५ रूपये, सुरू व खोडवा ऊसाकरिता २०० रूपये या प्रमाणे सभासदांच्या खात्यावर दिवाळी सणा अगोदर वर्ग करण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला आहे. तसेच कारखाना कायम व हंगामी कामगारांना दिवाळी करिता १५ टक्के अँडव्हान्स बोनस निर्णय घेण्यात आला आहे.

कारखान्याचा गाळप हंगाम सन २०२०-२१ हा २७ आँक्टोंंबर रोजी सुरू झाला असून आज अखेर २८ हजार ४८४ मे.टन. ऊसाचे गाळप होवून २२ हजार १०० क्विंटल साखर उत्पादित झाली आहे. चालू गळीत हंगामाकरिता कार्यक्षेत्रात ३२ हजार ९४९ एकर क्षेत्रावर ऊस लागवड झालेली असून त्यापासून अंदाजे सुमारे १२.५० लाख मे.टन. इतका ऊस गाळपासाठी उपलब्ध होईल असा अंदाज आहे. गाळप हंगाम २०२१-२२ करिता आज अखेर २१ हजार ७४० एकर ऊस लागवडीची नोंद झाली असून चालू गळीत हंगाम २०२०-२१ सुरळीत पार पाडण्यासाठी गत वर्षीप्रमाणे सर्व सभासदांनी सहकार्य करावे असे आवाहन ‘सोमेश्वर’चे चेअरमन पुरूषोत्तम जगताप यांनी केले आहे.

‘सोमेश्वर’ चा अंतिम दर ३ हजार रूपये
२ नोव्हेंबर रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत गत हंगामात गाळप झालेल्या आडसाली ऊसा करिता ३ हजार रूपये प्रति मे.टन., पुर्व हंगामी ऊसाकरिता ३ हजार ७५ रूपये प्रति मे. टन. तसेच सुरू व खोडवा ऊसाकरिता ३ हजार १०० रूपये प्रति मे. टन. या प्रमाणे अंतिम ऊस देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती चेअरमन पुरूषोत्तम जगताप यांनी दिली.