‘कुछ तो गडबड है…’; देशमुखांच्या घरावर CBI चे छापे पडताच संजय राऊतांचे ट्विट

मुंबई :  पोलीसनामा ऑनलाइन – केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या निवासस्थान, कार्यालये मिळून अशा दहा ठिकाणी आज सकाळी धाडी टाकल्या. या कारवाईमुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. त्यानंतर आता यावरून शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी ट्विट करत म्हटले, की ‘कुछ तो गडबड है…’

पोलिस अधिकारी सचिन वाझे यांना अनिल देशमुख यांनी 100 कोटी रुपयांच्या वसूलीचे टार्गेट दिल्याचा गंभीर आरोप मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी ‘लेटरबॉम्ब’च्या माध्यमातून केला होता. त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप झाला होता. न्यायालयाने अनिल देशमुख यांच्या सीबीआय चौकशीचे आदेश दिले. सीबीआयकडून देशमुख यांची चौकशीही झाली. त्यानंतर आता त्यांच्याशी संबंधित अशा 10 ठिकाणांवर छापेमारीची कारवाई करण्यात आली. त्यावरून संजय राऊत यांनी ट्विट करून म्हटले, की ‘कुछ तो गडबड है… मा. उच्च न्यायालयाने फक्त प्राथमिक चौकशीचे आदेश देत अहवाल सादर करा, असे सीबीआयला सांगितले होते. अनिल देशमुखावर धाडी. एफआयआर…वगैरे अतिरेक आहे. हा सर्व प्रकार न्याय व तर्कसंगत दिसत नाही. दया…कुछ तो गडबड जरूर है.’

दरम्यान, उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या इमारतीबाहेर स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ गाडी आढळली होती. त्यामध्ये निलंबित पोलिस अधिकारी सचिन वाझे यांचे नाव आले होते. त्यानंतर मुंबईचे तत्कालीन पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांना पदावरून दूर करण्यात आले होते. याचदरम्यान परमबीर सिंग यांनी अनिल देशमुखांवर आरोप केले होते.