बाप-लेकाकडून वाहतूक पोलिसाला मारहाण

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – नो एन्ट्रीमधून कार नेणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी आलेल्या वाहतूक पोलिसाला कारमधील बाप-लेकाकडून बेदम मारहाण करण्यात आली. ही घटना नाना चौक-गावदेवी परिसरात घडली. याप्रकरणी गावदेवी पोलिसांनी सरकारी कामात अडथळा आणि पोलिसाला केलेल्या मारहाण प्रकरणी चालक मुलगा आणि बापाला अटक केली आहे.

ताडदेव वाहतूक शाखेत कार्यरत असणारे पोलीस कॉन्स्टेबल नामदेव सानप हे शुक्रवारी फॉरजेट स्ट्रीट या ठिकाणी वाहतुकीचे नियमन करत होते. त्यावेळी येथील नो एन्ट्री मधून एक कार येत असताना त्यांना दिसली. नियम मोडणाऱ्या कारवर कारवाई करण्यासाठी ते पुढे आले. त्यांनी कारवाईसाठी कार थांबवली. कारवाई सुरू असताना कार चालवणारा जशन मुनवानी आणि त्याचे वडील जय मुनवानी हे दोघे कारमधून बाहेर आले. त्या दोघांनी सानप यांच्याशी हुज्जत घालण्यास सुरुवात केली. तरी देखील सानप कारवाई करत असल्याचे पाहून ते दोघे सानप यांच्य अंगावर धावून गेले आणि मारहाण करण्यास सुरुवात केली.

या ठिकाणी उपस्थित असलेल्या नागरिकांनी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला मात्र ते दोघे कोणाचेही ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. बाप-लेकाने सानप यांना मारहाण करत त्यांच्या हातातील ई-चलन मशीन खाली पाडली. दरम्यान, या गोंधळामुळे या ठिकाणी वाहतूक कोंडी झाली.

हा प्रकार सुरू असताना काहींनी मोबाईलमध्ये चित्रीकरण करून ते सोशल मीडियावर व्हायरल केले. सानप यांनी गावदेवी पोलीस ठाण्यात तक्रार केली. कारचा क्रमांक आणि चित्रीकरणाच्या व्हिडीओच्या आधारे गावदेवी पोलिसांनी जशन आणि जय या दोघांना शोधून अटक केली. या दोघांना न्यायालयाने १५ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

You might also like