SAD NEWS : पाडव्याला खरेदी केलेल्या ट्रॅक्टरचा अपघात; पोलिस कर्मचार्‍यासह मुलाचा दुर्देवी मृत्यू, पुणे जिल्हयातील घटना

पुणेः पोलीसनामा ऑनलाइन – गुढी पाडव्याच्या शुभ मुहर्तावर खरेदी केेलेला नवा ट्रॅक्टर घेऊन शेतात मशागतीची कामे करण्यासाठी जातांना झालेल्या अपघातात पोलीस कर्मचारी असलेल्या वडिल आणि मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर चालकाची प्रकृती चिंताजनक असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. जुन्नर तालुक्यातल्या आदिवासी पट्ट्यातील राळेगन गावात ही दुर्दैवी घटना घडली आहे. नवीन ट्रॅक्टरने काम करण्याच्या आनंदात शेताकडे निघालेल्या पिता-पुत्राचा असा दुर्दैवी मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

सोपान उंडे, तेजस उंडे (वय 20) असे अपघातात ठार झालेल्या बाप-लेकाची नाव आहेत. मृत सोपान उंडे हे कल्याण येथील पोलीस ठाण्यात कार्यरत होते. तर ट्रॅक्टरचालक संदेश तळपे हा जखमी झाला असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सोपान उंडे सुटीवर राळेगण ह्या आपल्या गावी आले होते. उंडे यांनी पाडव्यालाच नवीन ट्रॅक्टर खरेदी केला होता. तो ट्रॅक्टर घेऊन संदीप उंडे, त्यांचा मुलगा तेजस आणि ट्रॅक्टरचालक असे तिघे शेतीच्या मशागतीचे काम करण्यासाठी चालले होते. मात्र जाताना रस्त्यात एक तीव्र सरळ चढण लागला. त्यावर ट्रॅक्टर चढवताना चालकाचे ट्रॅक्टरवरचं नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टर 20 फूट खोल असलेल्या खड्ड्यात उलटून पुन्हा उभा राहिला. यादरम्यान ट्रॅक्टरचे हूड दबल आणि त्यात सोपान उंडे तसेच चालक अडकले. मुलगा तेजस मात्र तिथेच जमिनीवर पडला होता. ट्रॅक्टर तसाच पुढे 100 मीटर जाऊन एका झाडाला धडकून थांबला. गंभीर जखमी चालक कसाबसा ट्रॅक्टरच्या हुडातून सुटका करून बाहेर आला व त्याने आरडाओरडा केला. पण दुपारची वेळ असल्याने आजुबाजूला कुणीही नव्हते. त्यामुळे कोणीही मदतीला आले नाही. त्यामुळे चालकाने घंगाळदरे व राळेगन गावातल्या लोकांना फोन करुन बोलावले. लोक मदतीसाठी पोहोचले तोवर उशीर झाला होता. सोपान उंडे ट्रॅक्टरच्या हुडात अडकून जागीच ठार झाले. त्यानंतर मुलगा तेजस व ड्रायवर संदेश तळपे यांना दवाखान्यात नेलं पण वाटेतच मुलगा तेजसचाही मृत्यू झाला.