संतापजनक ! ‘या’ कारणासाठी मुलाने मित्राच्या मदतीने केला वडिलांचा खुन

भंडारा : पोलीसनामा ऑनलाइन – कोंढा-कोसरा येथील शिक्षक लीलाधर जिभकाटे यांचा मृतदेह त्यांच्याच शेतामध्ये तयार केलेल्या खड्ड्यात आढळला होता. या घटनेमुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती. या प्रकरणाचा उलगडा करीत अड्याळ पोलिसांनी पित्याचा मारेकरी असलेल्या मुलास व त्याच्या मित्राला अटक केली आहे. मंगेश लीलाधर जिभकाटे असे आरोपीचे नाव असून पैशाच्या मागणीवरून त्याने मित्राच्या मदतीने आपल्या वडिलाची हत्या केल्याची कबुली पोलिसांना दिली आहे.

आरोपी मंगेश जिभकाटे हा नागपूरवरून गोंदिया येथे त्याचा मित्र रामचंद राजाराम हिंगे याच्यासोबत मिळून मोटार सायकलने कोंढा येथे आपल्या घरी आला व वडिलांना पैशाची मागणी करू लागला. वडिलांनी पैसे देण्यास नकार दिल्याने दोरीने त्याचा गळा आवळून त्यांना ठार मारले व मृतदेह पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मित्राच्या मदतीने मोटार सायकलवर मांडून आपल्या शेतामध्ये खड्ड्यात पुरला.
कोंढा कोसरा शेतशिवारात शिक्षक असलेले लीलाधर तानबाजी जिभकाटे (५७) रा. कोंढा कोसरा यांचा मृतदेह त्यांच्याच शेतामध्ये तयार केलेल्या खड्ड्यात मृतावस्थेत आढळला. याची माहिती अड्याळ पोलिसांना देण्यात आली. परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक स्वप्निल जाधव आपल्या ताफ्यासह त्या ठिकाणी गेले. त्यांनी मृतदेहाची स्थिती पाहिली असता गळ्यावर दोरीने आवळल्याच्या खुणा दिसून आल्या. प्रथमदर्शनी लीलाधर यांचा खून करण्याचा अंदाज पथकाला मिळाल्याने त्यानी ती माहिती पोलीस अधीक्षक विनीता साहू व उपविभागीय पोलीस अधिकारी पवनी प्रभाकर तिक्कस यांना दिली. या प्रकरणात फिर्यादी ज्ञानेश्वर तानबाजी जिभकाटे रा. कोंढा यांच्या तक्रारीवरून अड्याळ पोलीस स्टेशन येथे अप क्र. ०६/२०१९ कलम ३०२, २०१ भादंवि अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.

मिळालेल्या माहितीच्या आधारे मृतक लीलाधर जिभकाटे आणि त्यांचा मोठा मुलगा मंगेश जिभकाटे यांच्यात आपसात नेहमी खटके उडत होते. मंगेश जिभकाटे हा उच्चशिक्षित असून त्याचे एम.टेक पर्यंतचे शिक्षण पूर्ण झालेले आहे व तो नागपूर येथे पुढील शिक्षण घेत होता व नेहमीच वडिलांना मोठ्या रकमेची मागणी करीत होता. या माहितीवरून पोलीस निरीक्षक रवींद्र मानकर यांनी मृतक लीलाधर जिभकाटे यांचा मोठा मुलगा मंगेश यास ताब्यात घेऊन त्याच्यावर प्रश्नांचा भडीमार केला असता त्याने वडील लीलाधर यांचा खून मित्र रामचंद्र राजाराम हिंगे रा. हसारा हल्ली मुक्काम बसंतनगर गोंदिया यांच्यासोबत मिळून केल्याचे कबूल केले. त्यावरून आरोपी नामे मंगेश लीलाधर जिभकाटे (२५) व त्याचा मित्र रामचंद राजाराम हिंगे (३२) यांना पोलिसांनी अटक केलेली आहे.