विवाहबाह्य संबंध असलेल्या आईच्या प्रियकराची मुलानेच केली हत्या

मुंबईः पोलीसनामा ऑनलाईन – आईसोबत असलेल्या अनैतिक संबधावरून 36 वर्षीय व्यक्तीची मुलानेच हत्या केल्याची धक्कादायक घटना मुंबईतील धारावी परिसरात समोर आली आहे. या प्रकरणी धारावी पोलिसांनी गुन्हा नोंदवून आरोपीला अटक केली आहे.

सचिन कुचीकोवर असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. धारावी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धारावीच्या शिवशक्तीनगर परिसरात संक्कया मार्ग येथे सचिन कुचीकोवर हा आपल्या कुटुंबियांसोबत राहत होता. त्याच परिसरात आरोपी हा त्यांच्या कुटुंबियांसोबत राहतो. मृत सचिनचे आरोपीच्या आईसोबत विवाहबाह्य संबंध असल्याची चर्चा होती. याबाबत सुगावा आरोपीला लागल्यानंतर त्याने सचिनचा काटा काढायचे ठरवले. रविवारी दुपारी सचिन हा परिसरातील लक्ष्मी स्टोअरमागे असताना आरोपीने त्याला रस्त्यात गाठून त्याला अडवले. त्यावेळी दोघांमध्ये शाब्दिक वाद आणि भांडण झाले. त्यावेळी आऱोपीने सचिनच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार करून गंभीर जखमी केले. यात सचिन रक्ताच्या थारोळ्यात पडला होता.

घटनेची माहिती मिळाल्यानंतर धारावी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी जखमी सचिनला सायन रुग्णालयात दाखल केले. मात्र सचिनच्या शरीरातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. दरम्यान सचिनच्या बहिणीने दिलेल्या तक्रारीवरून धारावी पोलिसांनी आरोपी विरोधात गुन्हा नोंदवून अटक केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.